गरजू कलावंतांसाठी अभिनव वादन
By Admin | Updated: September 7, 2016 02:17 IST2016-09-07T02:17:27+5:302016-09-07T02:17:27+5:30
ढोल-ताशांच्या तालावर बेधुंद थिरकल्याशिवाय गणेशोत्सवातील मिरवणूक पूर्ण होऊच शकत नाही. विसर्जन मिरवणुकांमध्ये मानाचा तुरा रोवणाऱ्या आणि तमाम प्रेक्षकांचे

गरजू कलावंतांसाठी अभिनव वादन
ढोल-ताशांच्या तालावर बेधुंद थिरकल्याशिवाय गणेशोत्सवातील मिरवणूक पूर्ण होऊच शकत नाही. विसर्जन मिरवणुकांमध्ये मानाचा तुरा रोवणाऱ्या आणि तमाम प्रेक्षकांचे आकर्षण ठरणाऱ्या कलाकारांच्या कलावंत पथकाची मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी एकत्र येऊन तीन वर्षांपूर्वी स्थापना केली. या पथकामध्ये सेलिब्रेटींसोबतच पडद्यामागील कलाकारदेखील वादन वाजवण्याचा आनंद घेतात. कलावंत पथक आणि त्यांच्या एकंदरीतच प्रवासाविषयी सौरभ गोखलेने ‘सीएनएक्स’शी संवाद साधला.
कलावंत पथक स्थापन करण्याची संकल्पना अस्ताद काळेची होती. हे आमच्या पथकाचे तिसरे वर्ष आहे. डीजे ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे आम्ही पारंपरिक वाद्यांकडे वळण्याचा विचार केला. आमचे पथक वादन वाजवताना पोलिसांच्या सर्व नियमांचे पालन करते. तसेच आमच्या पथकात एकावेळी केवळ 30 ते 40 ढोलच असतात. त्यामुळे आमच्या पथकाची गेल्या तीन वर्षांपासून लोकांमध्ये चांगलीच चर्चा आहे.
पथकातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर व्हावा यासाठी आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. यंदा गरजू कलाकारांना मदत करण्याचा आमचा मानस आहे. कलाकारांना पेन्शन हे नसते. त्यामुळे अनेक कलाकारांची उतारवयात आर्थिक परिस्थिती ही अतिशय बेताची होते. काही ज्येष्ठ कलाकारांची परिस्थिती तर फारच हलाकीची आहे. त्यांच्याकडे औषधासाठीदेखील पैसे नाहीत. अशा कलाकारांना आम्ही मदत करणार आहोत. आम्हाला यंदा मिळणारे सगळे मानधन आम्ही त्यांना देणार आहोत.
गेली तीन वर्षं केवळ आम्ही पुण्यातील गणेशोत्सवात वादन वाजवतो. पण आमचे पथक पुढील वर्षी मुंबई आणि कोल्हापूर येथील सुपाऱ्यादेखील घेणार आहे. बऱ्याच कलाकारांना ढोल-ताशा वाजवण्याची इच्छा असते. परंतु त्यांना त्याच्या कामाच्या वेळापत्रकामुळे पुण्यात येणे जमत नाही त्यांच्यासाठी आम्ही आमच्या पथकाचा विस्तार मुंबई आणि कोल्हापूरमध्ये करायचा ठरवला आहे.
पूर्वी आमच्या पथकात मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमीशी संबंधितच लोक सहभागी होते. पण आता कन्स्ट्रक्शन, हॉटेल अशा विविध हायप्रोफाईल क्षेत्रातील लोकदेखील वादन करू शकतील. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रातील सेलिब्रेटी असतो हा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे.
आम्ही यंदा जंगली महाराज रोडवरील शिरोळे मंडळ, सांगवी येथील एक मंडळ, डांगे चौक, लक्ष्मी रोड, जोगेश्वरी गणपती मंडळांसाठी वादन करणार आहोत.
सौरभ गोखले : शाळेत असल्यापासूनच मला ढोल आणि ताशा वाजवण्याची फार इच्छा होती. पण तेव्हा काही जमले नाही. काही वर्षांपूर्वी मी एका मंडळात जाऊन वादन केले होते. त्यानंतर एकदा अस्ताद आणि माझी सहजच चर्चा सुरू होती. त्याने मला विचारले, आपण कलाकारांसाठी पथकाची स्थापना करूयात का? मला अस्तादची कल्पना आवडली आणि मी लगेचच होकार दिला. मिरवणुकीत ढोल-ताशांचे वादन करण्याचा अनुभव फारच छान असतो.