अननुभवी दिग्दर्शकाची शिकार
By Admin | Updated: September 14, 2015 03:10 IST2015-09-14T03:10:07+5:302015-09-14T03:10:07+5:30
‘द परफेक्ट गर्ल’ एक चांगली प्रेमकथा आहे; पण एका अननुभवी दिग्दर्शकाची ती शिकारही ठरली आहे. दिग्दर्शन आणि संंगीताची चांगली साथ मिळाली असती तर कदाचित चित्रपट वेगळा ठरू शकला असता

अननुभवी दिग्दर्शकाची शिकार
‘द परफेक्ट गर्ल’ एक चांगली प्रेमकथा आहे; पण एका अननुभवी दिग्दर्शकाची ती शिकारही ठरली आहे. दिग्दर्शन आणि संंगीताची चांगली साथ मिळाली असती तर कदाचित चित्रपट वेगळा ठरू शकला असता. अर्थात नव्या कलाकारांचा दमदार अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू आहे.
प्रशांत नंबियार दिग्दर्शित चित्रपटाची कथा ही वेदिका (तारा अलिशा बेरी) आणि जय (तिशे) यांच्याभोवती फिरत राहते. या लव्हस्टोरीची सुरुवात गोव्यातून होते. मुंबईला जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या वेदिकाला इम्प्रेस करण्यासाठी जय तिला १० मिनिटांचा वेळ मागतो. वेदिका त्यासाठी तयारही होते. बराच वेळ सोबत फिरल्यानंतर त्यांच्यातील प्रेम फुलते.
मुंबईला जाण्यापूर्वी वेदिका त्याला आपला नंबर देते. मात्र हा नंबर अर्धवट असल्याने जय तिच्याशी संपर्क करू शकत नाही आणि तिला शोधण्याचा तो एकच ध्यास घेतो, भटकत राहतो. १५ वर्षांनंतर एका मित्राच्या मदतीने तो वेदिकाला शोधण्यात यशस्वी होतो आणि त्याला समजते, की वेदिकाही त्याच्याच प्रतीक्षेत आहे. अर्थात चित्रपटाचा हॅप्पी दी एंड होणार हे वेगळे सांगायला नको.
दिग्दर्शक प्रशांत नंबियार यांच्यासाठी एक चांगला चित्रपट बनविण्याची संधी होती, पण त्यांनी ती गमावली. जयची फॅमिली हिस्ट्री आणि दोस्तीच्या ट्रॅकवरून भटकत कथानक मूळ प्रेमकथेवर येते; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. क्लायमॅक्सही परिणामकारक नाही. त्यामुळेच दिग्दर्शन या चित्रपटाची सर्वात मोठी कमजोरी आहे, असे म्हणावे लागेल. चित्रपट खूप पसरटही झाला आहे. त्यासाठी चांगल्या एडिटरची गरज होती. लव्हस्टोरीत संगीत हा महत्त्वपूर्ण भाग आहे. मात्र या चित्रपटात संगीताची बाजूही जमेची नाही. एकही गाणे लक्षात राहण्यासारखे नाही.
नवीन कलाकारांचा चांगला अभिनय हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. तारा अलिशा बेरीने वेदिकाच्या पात्राला पूर्ण न्याय दिला आहे. जयच्या भूमिकेसाठी तिशेनेही मेहनत घेतल्याचे जाणवते.