इमरान खानने उघड केलं रणबीर अन् रणवीरचं मानधन; बॉलिवूडची पोलखोल करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:01 IST2025-12-28T12:55:29+5:302025-12-28T13:01:04+5:30
रणबीर-रणवीरची फी ऐकून चक्रावून जाल! इमरान खानने उघड केलं बॉलिवूडचं 'बजेट गणित'

इमरान खानने उघड केलं रणबीर अन् रणवीरचं मानधन; बॉलिवूडची पोलखोल करत म्हणाला...
बॉलिवूडमध्ये सध्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांची लाट आहे. पण या चित्रपटांच्या बजेटचा मोठा हिस्सा हा केवळ मुख्य अभिनेत्यांच्या खिशात जातो, असा दावा अभिनेता इमरान खानने केला आहे. बऱ्याच काळापासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला इमरान खान आता 'हॅपी पटेल' चित्रपटातून कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये त्याने रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांसारख्या ए-लिस्ट स्टार्सच्या मानधनाबद्दल मोठा खुलासा केला.
समदीश भाटियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना इमरान खान म्हणाला, "जर तुम्ही आजच्या काळात थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करणारे ए-लिस्ट कलाकार असाल, तर तुम्ही प्रत्येक चित्रपटासाठी किमान ३० कोटी रुपये मानधन घेता. माझ्या वयाचा कोणताही अभिनेता, मग तो रणबीर कपूर असो, रणवीर सिंग असो किंवा शाहिद कपूर हे सर्व ३० कोटींपेक्षा कमी घेत नाहीत. जर यापैकी कोणीही त्यापेक्षा कमी मानधन घेत असेल, तर मला नक्कीच आश्चर्य वाटेल".
इमरान खानने यावेळी बॉलिवूडमधील कास्टिंग प्रक्रियेवरही टीका केली. तो म्हणाला की, "आजही, कास्टिंग पूर्णपणे बजेटवर आधारित आहे. त्याचा अभिनेत्याशी काहीही संबंध नसतो. तुम्ही भूमिकेसाठी योग्य आहात की नाही याची कोणालाही पर्वा नसते. ते फक्त विचार करतात, मी यातून किती पैसे कमवू शकतो?". इमरान खानने उदाहरण देताना 'मटरू की बिजली का मंडोला' चित्रपटाचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "सुरुवातीला या चित्रपटासाठी अजय देवगणची निवड झाली होती. पण, अजय देवगणने चित्रपट सोडल्यानंतर निर्मात्यांनी मला कास्ट केले. त्यांना माझ्याकडून पुरेसे पैसे मिळाले, त्यांचा उदरनिर्वाह झाला", असे स्पष्ट मत इमरान खानने मांडले.
केवळ मुख्य अभिनेत्यालाच एवढं अवाढव्य मानधन का दिलं जातं? असा सवालही इमरान खानने उपस्थित केला. कलाकारांची निवड केवळ 'मार्केटेबिलिटी'वर अवलंबून असते, ज्याचा कथेच्या गरजेपेक्षा व्यवहाराशी जास्त संबंध असतो, असे त्याने म्हटलं.