‘अमेरिकेत मी अभिनेत्री नव्हे गृहिणी असते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2017 02:46 IST2017-02-13T02:46:08+5:302017-02-13T02:46:08+5:30

‘कळत नकळत’, ‘धडाकेबाज’, ‘अशी ही बनवा बनवी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अश्विनी भावे यांनी प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. ‘हिना’ या चित्रपटातील अश्विनी यांची भूमिका तर खूपच गाजली होती.

'I'm not an actress in America' | ‘अमेरिकेत मी अभिनेत्री नव्हे गृहिणी असते’

‘अमेरिकेत मी अभिनेत्री नव्हे गृहिणी असते’

‘कळत नकळत’, ‘धडाकेबाज’, ‘अशी ही बनवा बनवी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अश्विनी भावे यांनी प्रमुख भूमिका साकरल्या आहेत. ‘हिना’ या चित्रपटातील अश्विनी यांची भूमिका तर खूपच गाजली होती. अश्विनी सध्या अमेरिकेत राहात असल्याने त्या खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करतात. त्यांचा ‘ध्यानीमनी’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत त्यांच्याशी
मारलेल्या गप्पा...
तुम्ही ‘ध्यानीमनी’ हा चित्रपट स्वीकारण्यामागे कारण काय होते?
- खरे सांगू तर ध्यानीमनी हे नाटक मी पाहिलेले नसल्याने मला या नाटकाविषयी तितकीशी माहिती नाहीये. या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर खरे तर मी घाबरले होते. कारण ही भूमिका मी आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. पण लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्तिरेखेतील बारकावे अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिले असल्याने मला ही भूमिका साकारणे सोपे गेले आणि चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी हे दोघे ध्यानीमनी हे नाटक अक्षरश: जगले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे अभिनय करताना माझी एखादी जरी चूक झाली तरी ते मला सांगतील याचा मला विश्वास होता आणि त्यामुळेच हा चित्रपट करण्याचा मी निर्णय घेतला.

अमेरिकेत राहात असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकत आहात. चित्रपट स्वीकारताना कोणत्या गोष्टींचा तुम्ही विचार करता?
- माझ्यासाठी भूमिकेच्या लांबीपेक्षा चित्रपटात भूमिका किती महत्त्वाची आहे हे महत्त्वाचे असते. तसेच चित्रपटाची पटकथा चांगली असल्याशिवाय मी चित्रपट करत नाही. आज मी खूपच चोखंदळपणे भूमिका निवडते. देवाच्या कृपेने आज मी माझ्या आयुष्यात खूप चांगल्याप्रकारे सेटल असल्याने मी पैशांसाठी चित्रपट करत नाही. ज्या भूमिकेमुळे मला समाधान मिळते अशाच भूमिका मी करते. तसेच चित्रपट स्वीकारताना चित्रपटातील कलाकार, निर्माते, दिग्दर्शक या गोष्टीदेखील माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असतात.

तुम्ही अमेरिकेत असताना तुमचा दिनक्रम काय असतो?
- अमेरिकेत असताना मी अभिनेत्री नसते तर केवळ एक गृहिणी असते. मला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी मी तिथे करते. मी माझ्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी जेवण बनवते. माझ्या मुलांच्या शाळेमध्ये जाते. एक आई, एक पत्नी या नात्याने मी सगळ्या गोष्टी करते आणि एक गृहिणी म्हणून जगण्यात मला खूप आनंद मिळतो.
तुम्ही घर आणि करियर यांच्यात ताळमेळ कसा घालता?
- मी भारतात चित्रीकरणासाठी केवळ काही महिने येते. मी भारतात आल्यावर माझ्या नवऱ्याने मुलांकडे लक्ष द्यायचे, तसेच त्या वेळात त्याने सँन फ्रान्सिस्को शहराच्या बाहेर जायचे नाही असे आमचे ठरलेले असल्याने मला चित्रीकरण करणे खूप सोपे जाते.

तुमची मुले अमेरिकेत लहानाची-मोठी झाली आहेत, त्यांनी तुमचे चित्रपट पाहिले आहेत का?
- कदाचित या चित्रपटाच्या मुहूर्ताच्यावेळी माझी मुलगी माझ्यासोबत आली होती. त्यावेळी चित्रपटात दाखवल्या गेलेल्या माझ्या कुटुंबाचा फोटो एका भिंतीवर लावला होता. माझ्यासोबत दुसरे लहान मूल आहे हे पाहून ती जोराजोरात रडायलाच लागली होती. त्यानंतर या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर माझा हात पकडतात हे दृश्य पाहून तर ती खूपच घाबरली होती. पण आता माझी मुलगी आणि मुलगा दोघेही मोठे झाले आहेत. त्यांच्याशी मी चित्रपटाविषयी गप्पा मारते. ‘ध्यानीमनी’ या चित्रपटाची संहितादेखील मी त्यांना ऐकवली होती. माझ्या मुलाला तर अभिनयात खूप रस आहे.

Web Title: 'I'm not an actress in America'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.