आजच्या काळात मी असते तर अभिनेत्री बनलेच नसते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2017 05:12 IST2017-04-10T05:10:49+5:302017-04-10T05:12:00+5:30
आशा पारेख यांनी ‘आसमान’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली

आजच्या काळात मी असते तर अभिनेत्री बनलेच नसते
- Prajakta Chitnis -
आशा पारेख यांनी ‘आसमान’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. ‘दिल देके देखो’ चित्रपटात त्या पहिल्यांदाच नायिकेच्या भूमिकेत झळकल्या. आशा पारेख यांनी पहिल्या चित्रपटापासून त्यांच्या दर्जेदार भूमिकांतून त्यांचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘द हिट गर्ल’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...
स्वत:चे आयुष्य पुस्काच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचावे, असा विचार तुम्ही
कसा केला?
- खालिद मोहोब्बद यांनी मला पुस्तकाबद्दल विचारल्यावर मी त्याबाबत विचार केला आणि त्यांना या पुस्तकासाठी होकार दिला. माझ्या जन्मापासून ते आजवरचा प्रवास या पुस्तकात लोकांना वाचायला मिळेल. मी माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या नातेसंबंधांविषयीदेखील सगळ्याच खऱ्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. केवळ मी पुस्तकात काही लोकांची नावे लिहिणे टाळले आहे. नावांचा उल्लेख न करताच माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीविषयी मी लिहिले आहे.
तुम्ही नव्वदीच्या दशकापर्यंत चित्रपटात काम करीत होता. त्यानंतर तुम्ही अभिनयक्षेत्राकडे पाठ फिरवली, याचे कारण काय?
- मला केवळ आईच्या भूमिका आॅफर होत होत्या आणि मला त्या करायचा कंटाळा आला होता. त्यामुळे मी अभिनय करायचा नाहीच, असे ठरवले. आज अमिताभ बच्चन यांच्यासाठी अनेक भूमिका लिहिल्या जात आहेत, तशाच भूमिका माझ्यासाठी लिहिल्या गेल्या, तर मला अभिनयक्षेत्रात परत यायला नक्कीच आवडेल.
तुम्ही अभिनयानंतर दिग्दर्शनाकडे वळला होता; पण आज तुम्ही मालिकांचे दिग्दर्शन अथवा निर्मितीदेखील करीत नाही, असे का?
-दिग्दर्शन करण्याची मला आवड होती. त्यामुळे मी एका गुजराथी मालिकेचे दिग्दर्शन केले. ती मालिका प्रचंड गाजली व त्यानंतर मी ‘कोरा कागज’ या हिंदी मालिकेचे दिग्दर्शन केले. तिलादेखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. पण, त्यानंतर डेली सोपचे फॅड आले. डेली सोपमुळे तुम्हाला क्रिएटिव्ह काम करण्याची संधी मिळत नाही. तसेच, वाहिन्यांच्या मंडळींचा हस्तक्षेप खूप असतो. या सगळ्या कारणांमुळे मी मालिकांपासून दूर राहिले.
आज तुमच्या आयुष्यातील सगळ्यात चांगला क्षण कोणता होता, असे तुम्हाला वाटते?
-‘दिल देके देखो’ चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर मला झालेला आनंद मी आजही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला या चित्रपटाआधी अनेक निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी चित्रपटात घेण्यास नकार दिला होता; पण या चित्रपटाने मला एका रात्रीत स्टार बनवले.
हेलन, वहिदा रहेमान यासारख्या तुमच्या काळातल्या अभिनेत्री आजही तुमच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. तुमच्या या मैत्रीबद्दल काय सांगाल?
-चित्रपटात काम करीत असताना मित्रमैत्रिणींसोबत फिरायला मला वेळच मिळत नसे. सकाळी साडेनऊ वाजता माझे चित्रीकरण सुरू होत असे ते रात्री साडेसहापर्यंत चालत असे आणि त्यानंतर सायंकाळी सात वाजता नृत्याचा कार्यक्रम असे. सुटीच्या दिवशी मी आराम करीत असे अथवा नृत्याची तालीम करीत असे. पण, आता गेल्या आठ-नऊ वर्षांपासून आम्ही सगळ्या जणी एकत्र भेटतो, फिरायला जातो, चित्रपट पाहतो, चित्रपटांवर गप्पा मारतो.
आजच्या आणि तुमच्या काळातील इंडस्ट्रीत काय फरक आहे, असे तुम्हाला वाटते?
आम्ही काम केले त्या वेळचा काळ आणि आजचा काळ संपूर्णपणे वेगळा आहे. तांत्रिकदृष्ट्या आज प्रचंड प्रगती झाली आहे आणि ती खूपच चांगली गोष्ट आहे. आमच्या वेळी लाइट, कॅमेरे अगदी साधे असायचे. आम्ही सेटवर गेल्यानंतर आजचे दृश्य काय आहे, हे आम्हाला सांगितले जायचे आणि त्यानंतर आम्ही संवाद पाठ करायचो व चित्रीकरण व्हायचे. आजच्या सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे आजच्या काळात मी असते, तर नक्कीच अभिनेत्री बनले नसते.