'सध्याच्या गाण्यांचे बोलच मला आवडत नाहीत'

By Admin | Updated: December 30, 2016 03:39 IST2016-12-30T03:39:52+5:302016-12-30T03:39:52+5:30

नव्वदीच्या दशकात कुमार सानू यांच्या गाण्याने रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यांची सगळीच गाणी सुपरहिट ठरली. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चित्रपटांमध्ये

'I do not like to talk about current songs' | 'सध्याच्या गाण्यांचे बोलच मला आवडत नाहीत'

'सध्याच्या गाण्यांचे बोलच मला आवडत नाहीत'

- Prajakta Chitnis

नव्वदीच्या दशकात कुमार सानू यांच्या गाण्याने रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यांची सगळीच गाणी सुपरहिट ठरली. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चित्रपटांमध्ये गाण्याचे प्रमाण कमी केले आहे. सध्याच्या गाण्याचे बोल त्यांना आवडत नाहीत. सध्याच्या गाण्यांबद्दल आणि संगीताबद्दल त्यांनी सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...

- तुमच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत, पण गेल्या काही वर्षांपासून तुम्ही गाणी खूप चोखंदळपणे निवडत आहात. तुम्ही चित्रपटात गाण्याचे प्रमाण खूपच कमी केले आहे. याचे कारण काय?
माझ्यासाठी गाण्यांचे शब्द हे अतिशय महत्त्वाचे आहेत. मी डबल मिनिंग अथवा वाईट अथार्ची गाणी गाणार नाही असे मी ठरवले आहे आणि आजकाल अशा गाण्यांची संख्या खूपच वाढलेली आहे. त्यामुळे मी या गाण्यांपासून दूरच राहातो. खरे तर एक कलाकार म्हणून समाजाच्याप्रती तुमचे काही कर्तव्य असते. अशा वाईट गाण्यांमधून तुम्ही समाजाला चुकीचा संदेश देत आहात. काळानुसार बदलायला पाहिजे असे माझे मत आहे. पण काळानुसार संगीतात बदल होऊ शकतो, काळानुसार गीतांच्या शब्दरचनेत कसा काय बदल होऊ शकतो हेच मला कळत नाही.

- सध्या जुनी गाणी नवीन स्वरूपात लोकांसमोर आणली जात आहेत, याविषयी तुमचे काय मत आहे?
खरे तर ही अतिशय चांगलीच गोष्ट आहे. कारण यामुळे जुनी गाणीदेखील नवीन पिढीपर्यंत पोहोचतात. पण ही गाणी नव्या स्वरूपात आणताना या गाण्यांच्या संगीतासोबत फेरफार केली जाते. पण असे होऊ नये. मला वाटते, संगीतात बदल न करता शक्य असल्यास या गाण्यातील काही भाग तरी मूळ गायकाकडून गायला जावा. त्यामुळे ते गाणे लोकांना अधिक जवळचे वाटू शकते.

- तुम्ही विविध भाषांमध्ये गाणी गाता, विविध भाषांमध्ये गाणी गाण्याचा अनुभव कसा असतो?
संगीताला कोणत्याही भाषेचे बंधन नसते. प्रादेशिक गाणी गाताना त्या प्रदेशाचा टच त्या गाण्याला यावा याचा मी नेहमी प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही चांगले गायक असता, त्यावेळी कोणत्याही भाषेचा अडसर तुम्हाला येत नाही. मला मराठी भाषेत गायला तर खूप आवडते. आता हलके हलके या चित्रपटात मी गाणार आहे. या गाण्याचे संगीत पी.शंकरम यांनी दिले आहे. हे गाणे रसिकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. तसेच अजय-अतुल यांचे संगीत मला खूप आवडते. त्यांच्यासोबत भविष्यात काम करण्याची माझी इच्छा आहे. बॉलिवूडच्या तुलनेत आजही प्रादेशिक गाण्यांचे बोल खूपच चांगले आहेत. त्यामुळे मी प्रादेशिक गाणी गाणे एन्जॉय करतो.

-आजच्या गाण्यांमध्ये जो बदल झालेला आहे, यासाठी एक गायक म्हणून तुम्ही काही पाऊले उचलणार आहात का?
गाणी म्हटली की, त्यावर केवळ नृत्य करायचे एवढेच आजकालच्या पिढीला माहीत आहे. पण गाणे म्हणजे केवळ नृत्य करण्यासाठी नसते. तुमचे मन उदास असताना एखादे गाणे ऐकावे असे तुम्हाला नक्कीच वाटत असते. त्यामुळे अशीही गाणी बनवली जावी असे मला वाटते. पण जोपर्यंत लोकांना उडती आणि अर्थ नसलेली गाणी ऐकायची आहेत, तोपर्यंत आपल्या चित्रपटांच्या गाण्यात काही बदल घडतील असे मला वाटत नाही. त्यामुळे मी चित्रपटात गाण्याऐवजी युट्युबला गाणी अपलोड करणे अधिक पसंत करतो.

Web Title: 'I do not like to talk about current songs'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.