प्रेग्नंन्सीकाळात मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या अन्...; मृत्यूच्या दारातून परतली 'ही' अभिनेत्री, सांगितला कठीण काळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 10:31 IST2025-11-24T10:25:33+5:302025-11-24T10:31:11+5:30
प्रेग्नंन्सीकाळात मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या अन्…; 'त्या' कठीण काळाविषयी अभिनेत्रीचं भाष्य

प्रेग्नंन्सीकाळात मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या अन्...; मृत्यूच्या दारातून परतली 'ही' अभिनेत्री, सांगितला कठीण काळ
Gal Gadot: जगभरात वंडर वूमन या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे गॅल गॅडोट.अभिनेत्री गॅल गॅडोट 'वंडर वुमन' या चित्रपटामध्ये काम करत प्रकाशझोतात आली . गॅल गॅडोट तिच्या प्रोजेक्ट्सह वैयक्तिक आयुष्यामुळेही तितकीच चर्चेत असते. अगदी वर्षभरापूर्वी या अभिनेत्रीने तिच्या चौथ्या बाळाला जन्म दिला. परंतु, या प्रेग्नन्सी काळात तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. प्रेग्नंन्सी काळात आठव्या महिन्यात मेंदूत रक्ताच्या गाठी आढळल्याने तिला सर्जरी करावी लागली होती.अशातच एका मुलाखतीत अभिनेत्रीने त्या कठीण प्रसंगावर भाष्य केलं आहे.
इस्रायली अभिनेत्री गॅल गॅडोटला सुरुवातीला डोके दुखीचा त्रास व्हायचा. त्यामु्ळे आईच्या सल्ल्यानुसार तिने एमआरआय करण्याचं ठरवलं. त्याचदरम्यान, डॉक्टरांनी तिला तिच्या मेंदुत रक्ताच्या गाठी असल्याचं सांगितलं. हे ऐकताच अभिनेत्री प्रचंड अस्वस्थ झाली होती. अलिकडेच गॅल गॅडोटने एका मुलाखतीत तिच्या आजारपणाबद्दल सांगितलं. तेव्हा ती म्हणाली," गेल्या वर्षी माझ्या आयुष्यात एक विचित्र गोष्टी घडल्या. मी ८ महिन्यांची प्रेग्नेंट होते.कुटुंब, काम आणि इतर सर्व गोष्टींमध्ये मी प्रचंड व्यस्त होते. त्याचदरम्यान मला प्रचंड डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. जवळपास ३ आठवडे हे सुरुच होतं. "
आईच्या सांगण्यावरून एमआरआय केला अन्...
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली," मी आईच्या सल्ल्यानुसार एमआरआय केला. त्यानंतर घरी पोहोचताच मला डॉक्टरांचा फोन आला. ते म्हणाले, तू लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोच. ही गोष्ट खूप गंभीर आहे.तुझ्या मेंदुत रक्ताच्या गाठी आहेत. त्यावेळी मला काय करावं कळतंच नव्हतं. माझे पती वेगवेगळ्या डॉक्टरांशी बोलत होते आणि मी फक्त एवढाच विचार करत होते की, मी मरणार आहे का? माझं बाळ ठीक असेल ना." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला. याचवेळी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तीन तासांत अभिनेत्रीची डिलिव्हरी करण्यात आली, त्यानंतर तिचं ऑपरेशन करण्यात आलं होतं.
वर्कफ्रंट
'वंडर वूमन' म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या गॅल गॅडोटने 'फास्ट अँड फ्युरियस-6', 'डेट नाईट', 'रेड नोटिस', 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटांमध्ये देखील तिनं काम केलं आहे. शिवाय 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत झळकली होती.