धर्मेंद्र यांच्या निधनानंतर स्वतंत्र प्रार्थना सभा का ठेवली?; अखेर हेमा मालिनींनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 11:45 IST2026-01-05T11:42:46+5:302026-01-05T11:45:28+5:30
धर्मेंद्र यांच्या निधनानंतरही देओल कुटुंबासोबत दुरावा? हेमा मालिनी म्हणाल्या...

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर स्वतंत्र प्रार्थना सभा का ठेवली?; अखेर हेमा मालिनींनी दिली प्रतिक्रिया
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनानंतर लाखो चाहते हळहळले. दिलखुलास, हसतमुख अशीच त्यांची चाहत्यांमध्ये छबी होती. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांनी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलं सनी देओल- बॉबी देओल यांनी प्रार्थना सभा ठेवली होती. मात्र यावेळी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली गैरहजर होत्या. कारण हेमा मालिनी यांनी त्याचवेळी त्यांच्या घरी स्वतंत्र प्रार्थना सभा ठेवली होती. यावरुन धर्मेंद्र यांच्या निधनानंतरही दोन कुटुंबातलं अंतर संपलं नसल्याची चर्चा झाली. आता यावर हेमा मालिनी यांनी स्वत:च उत्तर दिलं आहे.
दोन वेगळ्या प्रार्थना सभा का?
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोन वेगवेगळ्या प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. सनी-बॉबी यांनी प्रार्थना सभेत हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना बोलवलंच नाही अशी चर्चा झाली. आता या विषयावर हेमा मालिनी यांनी स्वत:च टाइम्स ऑफ इंडियाला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, "ही आमच्या कुटुंबाची खाजगी गोष्ट आहे. आम्ही एकमेकांसोबत चर्चा केली. मी माझ्या घरी स्वतंत्र प्रार्थना सभा ठेवली कारण माझे जवळचे लोक वेगळे आहेत. मी दिल्लीतही प्रार्थना सभा आयोजित केली कारण मी राजकारणात आहे. त्यामुळे राजकीय लोकांसाठीही प्रार्थना सभा ठेवणं गरजेचं होतं. मथुरा माझा मतदार संघ आहे आणि तिथे धर्मेंद्र यांच्यासाठी लोक वेडे आहेत. म्हणून मी तिथेही प्रार्थना सभा ठेवली."
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी अजूनही त्या दु:खातून सावरलेल्या नाहीत. त्या म्हणाल्या, "हे दु:ख सहन करण्यापलीकडचे आहे. ते आजारी होते तेव्हा महिनाभर आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. रुग्णालयात जे काही घडत होतं त्याला सामोरं जात होतो. रुग्णालयात मी, बॉबी, सनी, ईशा, अहाना आम्ही सगळे एकत्रच होतो. याआधीही अनेकदा त्यांना अॅडमिट करण्यात आलं होतं पण दरवेळी ते बरे होऊन परत यायचे. यावेळीही असंच होईल असं आम्हाला वाटलं होतं. ते आमच्याशी गप्पाही मारत होते. माझ्या वाढदिवशी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. ८ डिसेंबरला ते ९० वर्षांचे होणार होते. आम्ही त्यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्याचा विचार करत होतो, तयारीही करत होतो. पण अचानक ते निघून गेले. त्यांना हळूहळू कमजोर होताना पाहणं खूप कठीण होतं. आज सकाळीच घरी ठेपले बनले होते. त्यांना चटणीसोबत खायला खूप आवडायचे. त्यांना इडली सांबार आणि कॉफीही आवडायची. आज जेव्हाही घरी हे पदार्थ बनवतात तेव्हा त्यांचीच आठवण येते. ते आमच्या मनात कायम जिवंत आहेत.