सर्वांसाठी हाफ तिकीट

By Admin | Updated: July 27, 2016 02:54 IST2016-07-27T02:54:48+5:302016-07-27T02:54:48+5:30

‘हाफ तिकीट’ या चित्रपटातील दोन चिमुकल्यांच्या कामाचे सध्या चांगलेच कौतुक केले जात आहे. यातील बालकलाकार विनायक पोतदार, शुभम मोरे, दिग्दर्शक समीर कक्कड

Half ticket for all | सर्वांसाठी हाफ तिकीट

सर्वांसाठी हाफ तिकीट

‘हाफ तिकीट’ या चित्रपटातील दोन चिमुकल्यांच्या कामाचे सध्या चांगलेच कौतुक केले जात आहे. यातील बालकलाकार विनायक पोतदार, शुभम मोरे, दिग्दर्शक समीर कक्कड आणि निर्माते नानू जयसिंघानी यांनी नुकतीच ‘लोकमत’ आॅफिसला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी या चित्रपटाविषयी आणि एकंदरीत आजच्या चित्रपटांविषयी खूप साऱ्या गप्पा मारल्या.

‘हाफ तिकीट’ या चित्रपटात नवीनच चेहऱ्यांना संधी द्यायची, असा या चित्रपटाचे निर्माते नानू जयसिंघानी यांचा हट्ट होता. त्यासाठी त्यांनी आणि दिग्दर्शक समीर कक्कड यांनी अनेक मुलांच्या आॅडिशन घेतल्या होत्या. या आॅडिशन जवळजवळ दीड-दोन महिने सुरू होत्या. या आॅडिशनमध्ये हजारो मुले आली होती आणि या हजारो मुलांमधून विनायक आणि शुभमची निवड करण्यात आली. विनायकने ‘रईस’ या चित्रपटात शाहरूखच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. ‘रईस’ या चित्रपटाचे चित्रीकरण ‘हाफ तिकीट’च्या आधी सुरू झाले असले, तरी ‘हाफ तिकीट’ हा आधी प्रदर्शित ठरल्यामुळे ‘हाफ तिकीट’ विनायकचा पहिला चित्रपट ठरणार आहे, तर हाफ तिकीट हा शुभमचाही पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला असल्याचे ते दोघेही सांगतात. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकत्रच राहात असत. यामुळे त्या दोघांची चांगलीच गट्टी जमली आहे, पण त्याचसोबत त्या दोघांनी छोटी-मोठी भांडणही केल्याचे ते सांगतात.
लहान मुलांसोबत काम करण्याचा अनुभव हा अधिक चांगला असतो, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर कक्कड सांगतात. या चित्रपटात झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका कुटुंबाची कथा दाखविण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे त्यांनी खऱ्या झोपडपट्टीत केले आहे. हे चित्रीकरण करत असताना, या कुटुंबांमध्ये असणारी एकी पाहून मी थक्क झालो, असे समीर सांगतात. त्यांच्याकडून आपण खूप काही शिकण्याची गरज आहे, असेही त्यांना वाटते. ‘हाफ तिकीट’ हा चित्रपट खूप वेगळा असल्याचे या चित्रपटाचे निर्माते नानुभाई जयसिंघानी सांगतात. हा चित्रपट भारतासोबतच अमेरिका, लंडन, कॅनडा येथे प्रदर्शित करण्याचा त्यांचा विचार आहे, तसेच याचे स्क्रिनिंग अनेक फेस्टिव्हलमध्येही करण्यात येणार आहे. अनेक वेळा चित्रपट फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध झाल्यावर प्रदर्शित केला जातो, पण अशा वेळी चित्रपट लिक होण्याची भीती असते. त्यामुळे त्यांनी हा चित्रपट प्रथम प्रदर्शित करण्याचे ठरवले, असे ते सांगतात. एकाच आठवड्याला तीन-चार चित्रपट प्रदर्शित करणे अथवा एखादा चित्रपट अतिशय गाजत असताना आपला चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे. त्यामुळेच सैराट फिव्हर उतरल्यावरच मी माझा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले, असेही ते सांगतात.

- prajaktachitnis@lokmat.com

Web Title: Half ticket for all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.