'गोलमाल ५'मध्ये 'हा' अभिनेता कमबॅक करणार? रोहित शेट्टी घेऊन येणार 'लेडी व्हिलन'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:19 IST2025-12-30T17:18:35+5:302025-12-30T17:19:12+5:30
प्रेक्षकांना खळखळून हसवायला पुन्हा येतोय 'गोलमाल'

'गोलमाल ५'मध्ये 'हा' अभिनेता कमबॅक करणार? रोहित शेट्टी घेऊन येणार 'लेडी व्हिलन'!
रोहित शेट्टी दिग्दर्शित सुपरहिट फ्रँचायझी 'गोलमाल'च्या पुढच्या पार्टची सर्वांनाच उत्सुकता आहे. आतापर्यंत 'गोलमाल'चे चार भाग आले. चारही सिनेमांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता रोहित शेट्टी 'गोलमाल ५' एका नव्या अंदाजात घेऊन येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये चक्क एक अभिनेत्री खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच पहिल्या भागातील एक अभिनेता 'गोलमाल ५'मध्ये परत येत आहे.
'गोलमाल ५'मध्ये रोहित शेट्टी आता फक्त कॉमेडी नाही तर फँटसी एलिमंटही घेऊन येणार आहे. तसंच 'गोलमाल'च्या जगात पहिल्यांदाच महिला खलनायकाची एन्ट्री होणार आहे. २००६ साली 'गोलमाल'चा पहिला भाग आला होता. त्यानंतर 'गोलमाल अगेन'पर्यंत सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आता पाचव्या पार्टसाठीही चाहते उत्सुक आहेत.
अजय देवगण पुन्हा एकदा गोपाळच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू ही टोळी आहेच. याशिवाय शरमन जोशी हे सरप्राईज असणार आहे अशी चर्चा आहे. शरमन जोशी २००६ साली आलेल्या पहिल्या 'गोलमाल'मध्ये दिसला होता. आता तो पाचव्या भागात कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे. तसंच सोबतीला जॉनी लिवर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी आणि अश्विनी कळसेकर ही गँग असणारच आहे.