टीव्ही अ‍ॅँकर्सलाही आले हीरोंचे ग्लॅमर

By Admin | Updated: September 7, 2015 03:09 IST2015-09-07T03:09:51+5:302015-09-07T03:09:51+5:30

टेलिव्हिजनवरील मालिका गाजतात त्या त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे, कथानकामुळे किंवा शीर्षक गीतामुळे. अगदीच गाण्याचा किंवा डान्स शो असेल तर त्यातील सहभागी कलाकार किंवा प्रसिद्ध जजेसमुळे

Glamor of diamond gems coming from TV anchorsar | टीव्ही अ‍ॅँकर्सलाही आले हीरोंचे ग्लॅमर

टीव्ही अ‍ॅँकर्सलाही आले हीरोंचे ग्लॅमर

टेलिव्हिजनवरील मालिका गाजतात त्या त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे, कथानकामुळे किंवा शीर्षक गीतामुळे. अगदीच गाण्याचा किंवा डान्स शो असेल तर त्यातील सहभागी कलाकार किंवा प्रसिद्ध जजेसमुळे. मात्र या कथानक, मनोरंजन करणारे डान्सर्स, गायक यांच्यापलीकडील जगात निखळ मनोरंजन करतात, इतकेच नव्हे, तर पडद्यामागील कलाकारही प्रेक्षकांसमोर आणतात किंवा गृहिणींना चमचमीत, स्वादिष्ट डिशेस बनवायला भाग पाडतात, असे अँकर्स बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. मात्र, अशा कार्यक्रमांना खरी रंगत आणतात ते हे अँकर्सच. संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळत, सदैव प्रेक्षकांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत, कार्यक्रमातील इतर कलाकारांशी मेळ घालत असतात.
आता हेच बघा की, महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घराघरांत पोहोचून वहिनींना पैठणी वाटणारे आदेश बांदेकर गेली १० वर्षे ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम यशस्वीपणे पुढे नेत आहेत. तर कॉमेडीची बुलेट टे्रन सुसाट नेणारी तेजस्विनी पंडित, पेशाने आयुर्वेदिक डॉक्टर मात्र अभिनय, उत्तम मिमिक्री आणि विविध नाटके, मालिका, चित्रपटांचा प्रवास उलगडणारा ‘चला हवा येऊ द्या’ म्हणणारा आणि कायम हसत राहा, असे सांगणारा डॉ. नीलेश साबळे. गृहिणींसाठी उत्तमोत्तम रेसिपी ‘आम्ही सारे खवय्ये’मधून घरपोच पोहोचवणारे प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे. ‘सारेगमपा’ हा कार्यक्रम ज्या अँकरमुळे खरोखरीच प्रसिद्ध झाला आणि ‘एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या’ हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडात बसवलेली पल्लवी जोशी, अभिजित खांडकेकर, लहान वयातच सहभागी कलाकारांशी मैत्री जमवत त्यांना प्रोत्साहन देणारी ‘गौरव महाराष्ट्राचा’ची मृण्मयी देशपांडे, ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हयात असलेल्या किंवा नसलेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना फोन लावून देऊन संभाषण करण्याची संधी देणारा गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी खऱ्या अर्थाने अँकर्सच्या जगात एक नवीन ओळख तयार केली आहे. त्यामुळे कार्यक्रमाची खरी रंगत चढते ती या अँकर्सच्या निवेदनामुळे. शोमधील सर्वच टीम, मग कधी कलाकार तर कधी जज तर कधी निर्मात्यांनाही कॅमेऱ्यासमोर एखाद्या नियमात बदल करायला लावत शोचा मूड आणि प्रेक्षकांचा रागरंग सांभाळणारे अँकर्स हे खरोखरच मल्टीटॅलेंटेड असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोमधून अ‍ॅँकर्स घराघरांत पोहोचले आहेत. आता या अ‍ॅँकर्सना हीरोचे ग्लॅमर मिळू लागले आहे. त्यामुळे पुढच्या काळात ‘कॉमेडी नाईट्स’मधल्या कपिलच्या पावलावर पाऊल टाकून मराठीतील अ‍ॅँकर्सही चित्रपटांचे हीरो बनू पाहत आहेत.

तब्बल ११ वर्षे सातत्याने ‘होम मिनिस्टर’च्या माध्यमातून केलेला निवेदकाचा प्रवास इतका अप्रतिम आहे, की एका कोपऱ्यात उभ्या राहणाऱ्या निवेदकाला आज प्रमुख पाहुण्याच्या खुर्चीत बसल्यासारखा मान मिळतो आहे. ही माझ्यासाठी खरोखरीच आनंदाची गोष्ट आहे. जवळपास १२ ते १३ लाख किलोमीटर प्रवास यादरम्यान झाला आहे आणि निवेदकाच्या रूपातून प्रेक्षक आणि कार्यक्रमाचा गाभा या दोन नात्यांमधील दुवा मी बनलो, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. यानिमित्ताने सर्वांचा आदर करत आणि मान राखत संपूर्ण महाराष्ट्राशी मला संवाद साधायला मिळत आहे.
- आदेश बांदेकर

‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमाच्या अँकरिंगचा अनुभव माझ्यासाठी खूपच मस्त आहे. कारण, इथे अशा लोकांसोबत काम करण्याचा अनुभव मिळतो ज्यांना कॅमेऱ्याचं काहीच माहीत नसतं. त्यापेक्षाही त्या गृहिणींना कॅमेऱ्यासमोर येण्याचा जितका आनंद आणि उत्सुकता असते तितकीच कॅमेऱ्याची भीतीही असते. त्यामुळे त्यांना खूप शिताफीने शांत करावं लागतं. ‘आम्ही सारे खवय्ये’च्या अँकरिंगमुळे मला एक वेगळी ओळख मिळाली आहे. बाहेर कुठेही लोक मला गमतीने जेवण झालं का? असं विचारण्याऐवजी ‘काय मगं, खवय्येगिरी झाली का?’ असं विचारतात. त्यामुळे अभिनयापेक्षाही माझ्यासाठी अँकरिंगचा अनुभव फॅन्टास्टिक आहे. - संकर्षण कऱ्हाडे

Web Title: Glamor of diamond gems coming from TV anchorsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.