गीतांचे ‘मराठीपण’ धोक्यात
By Admin | Updated: December 2, 2015 03:29 IST2015-12-02T03:29:56+5:302015-12-02T03:29:56+5:30
मराठी चित्रपटाने जगभरात भरारी घेतली असली तरी मराठी मातीत रुजलेला आपला चित्रपट हा खऱ्या अर्थाने कोणत्या कारणांसाठी ओळखला जातो, असे विचारले तर

गीतांचे ‘मराठीपण’ धोक्यात
मराठी चित्रपटाने जगभरात भरारी घेतली असली तरी मराठी मातीत रुजलेला आपला चित्रपट हा खऱ्या अर्थाने कोणत्या कारणांसाठी ओळखला जातो, असे विचारले तर नक्कीच वेगवेगळे मतप्रवाह समोर येतील... कुणी विषयांची वैविध्यता, सादरीकरण, मांडणी, तंत्रज्ञान यांना महत्त्व देईल, तर कुणाच्या ओठांवर नकळतपणे ‘संगीत’ असे उत्तर येईल.. जे येणं स्वाभाविकदेखील आहे म्हणा... कारण ‘संगीत’ हा मराठी चित्रपटांचा नेहमीच आत्मा राहिला आहे. संगीत म्हणजे केवळ सात सूर किंवा चाल नव्हे, तर त्या गीताच्या प्रत्येक मुखड्यातील अप्रतिम अशा शब्दांनाही तितकेच अमूल्य महत्त्व आहे. थोडंसं भूतकाळात गेलात ना, तर याची नक्कीच प्रचिती येईल. मग ती गाणी भावगीत, भक्तिगीत, उडत्या चालीची किंवा युगुलगीते असो... आजही ती गाणी रसिकांच्या स्मरणात राहिली असून, ओठांवर रुंजी घालत आहेत. कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, आरती प्रभू, इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर या मराठी वाङ्मयाला आपल्या सिद्धहस्त लेखणीतून समृद्ध केलेल्या साहित्यिकांपासून ते जगदीश खेबुडकर, ना. धों. महानोर, सुरेश भट, ग्रेस, तसेच गुरू ठाकूर, संदीप खरे, जितेंद्र जोशी आणि स्पृहा जोशी या आत्ताच्या फळीच्या गीतकारांनी मराठी चित्रपटगीतांना अर्थघनतेचा एक अनोखा आयाम दिला आहे. या गीतकारांमुळे मराठी गाण्यांना आशयाचे सुंदर कोंदण लाभले आहे. पण आजची मराठी गाणी ऐकली की शब्द आणि संगीत अशा एकमेकांमध्ये समरसून गेलेल्या परंपरेला काहीसा धक्का पोहोचल्यासारखे लक्षात येईल. गाण्यांमधील हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी शब्दांच्या शिरकावामुळे मराठी गीतांचे सौंदर्यच आज हरवून गेले आहे. गीतकारांची प्रतिभासंपन्नता लोप पावत चालली आहे की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. आजचा चित्रपट कोणासाठी आहे तर तो तरुणाईसाठी. मग त्याला आकर्षित करायचे असेल तर ‘हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा भरणा हवाच... अशी काहीशी चुकीची धारणा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये रुजली आहे. म्हणूनच बॉलीवूडच्या पावलावर पावलं टाकत अगदी ’छम छम करता है ये नशिला बदन’ (अगं बाई अरेच्चा), ‘ये गं ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का’, ‘जिंदगी जिंदगी’ (दुनियादारी),’ ‘जहाँ जाऊ तुझे पाऊ’ (प्यारवाली लव्हस्टोरी), ‘तू ही रे माझा मितवा’ (मितवा), ‘तू मिला तो खुदा का सहारा मिल गया’ (टाइमपास 2), ‘रंग हे नवे नवे दुनिया ही नयी नयी’ (कॉफी आणि बरंच काही) अशा हिंदी संमिश्र गाण्यांची मराठीमध्ये चलती सुरू झाली आहे. तेवढ्यापुरता प्रेक्षकांनी त्या गाण्यांचा आस्वाद घेतला, पण मराठी मनाची पकड घेणे या गाण्यांना अद्याप तरी शक्य झालेले नाही. आपल्या अद्वितीय लेखणीतून गीतांना वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनीदेखील याला सहमती दर्शवली. चित्रपट चालविण्यासाठी असे प्रयोग केले जातात जे तात्पुरते असतात. मात्र याने ना चित्रपट चालतो ना ती गीते लोकांच्या स्मरणात राहतात. संतपरंपरेमध्ये छंदोबद्ध रचनांचा वापर करण्यात आला आहे. मराठी ही प्रमाणित भाषा आहे. तिचा जितका उपयोग केला जाईल तितकी ती समृद्ध होईल. मराठी शब्दांना एक लयबद्धता आहे, मराठी ही अर्वाचीन भाषा असून, तिला शाहिरी परंपरेचा स्पर्श आहे. लोकजीवनावरील ही कविता असल्याने नवीन शब्दांचा लहेजा तयार केला पाहिजे. एकनाथांच्या भारूडामध्ये नवऱ्यासाठी ‘दादल्या’ हा शब्द सापडतो. गीतकारांमध्ये सृजनशीलता निर्माण झाली पाहिजे, असे ते सांगतात. आपल्या मराठी चित्रपट गीतांना शब्दसौंदर्याची एक अद्भुत अशी परंपरा आहे. तिला छेद देत वेगळा मार्ग निवडायचा प्रयत्न केला तर त्या संगीत कालखंडाच्या प्रवाहाची दिशा बदलायला वेळ लागणार नाही. या संगीत प्रवाहाचा मार्ग सध्या वेगळ्याच दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. गीतकारांनी वेळीच त्याचे गांभीर्य न ओळखल्यास आपल्याच परंपरेची पाळंमुळं आपल्याच हाताने बंद करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही!
मराठी भाषेचा दर्जा टिकवायचा असेल तर गीतकारांनी नवीन पर्यायी शब्द निर्माण केले पाहिजेत. गाण्यांमध्ये उगाच इतर भाषेच्या शब्दांचा समावेश करून ती गाणी चालतील ही त्यांची भ्रामक कल्पना आहे. मराठी शब्दांना सर्जनशीलतेतून नवीन मोड देता येऊ शकतो.
- ना. धों. महानोर, ज्येष्ठ कवी
मराठी गाण्यांत हिंदी किंवा इंग्रजी शब्द काही वेळाच चांगले वाटतात. कारण तसं करायचंच असेल तर गाण्याचा तसा फ्लेवर असला पाहिजे. मराठी भावगीताच्या चालीवर हिंदी-इंग्रजी शब्द किंवा गाणं चालूच शकत नाही. जशी चाल आहे तसेच शब्द असले पाहिजेत, असं मला वाटतं.
- स्पृहा जोशी,
अभिनेत्री आणि कवयित्री
हिंदी-इंग्रजी शब्द मिक्स असलेलं गाणं चित्रपटाच्या कथेशी निगडित असलं पाहिजे; पण तेही आवश्यकता असेल तरच. पण असं करून फारसा उपयोग होतो असं मला वाटत नाही. त्यापेक्षा दिग्दर्शक, निर्मात्यांनी क थेवर अधिक लक्ष देऊन त्यावर काम केलं पाहिजे.
- संदीप खरे, कवी
namrata.phadnis@lokmat.com