धक्कातंत्राची खिळवणारी गूढरम्यता..!

By Admin | Updated: April 17, 2017 03:56 IST2017-04-17T03:56:54+5:302017-04-17T03:56:54+5:30

नाटकात धक्कातंत्राचा प्रयोग करत कथासूत्र अधिकाधिक रंजकतेकडे कसे वळेल, याचे कसब नाटककार सुरेश जयराम यांना साध्य आहे

Fraudulent intrigue ..! | धक्कातंत्राची खिळवणारी गूढरम्यता..!

धक्कातंत्राची खिळवणारी गूढरम्यता..!

तिसरी घंटा - राज चिंचणकर
नाटक - छडा
नाटकात धक्कातंत्राचा प्रयोग करत कथासूत्र अधिकाधिक रंजकतेकडे कसे वळेल, याचे कसब नाटककार सुरेश जयराम यांना साध्य आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या रहस्यप्रधान नाटकांत त्याचे प्रतिबिंब पडलेले आहे. याच मांदियाळीतले ‘छडा’ हे त्यांचे नवे नाटक आहे. साहजिकच, त्यांच्या अनुभवी लेखणीतून उतरलेल्या या नाटकाने श्वास रोखून धरायला लावला, तर त्यात नवल नाही. रहस्यकथेचा आकंठ आनंद घेणारा वेगळा रसिकवर्गही आहेच आणि त्यांना गूढरम्यतेची भरपेट मेजवानी देणारे नाटक म्हणून ‘छडा’ या नाटकाचा उल्लेख करावा लागेल.
कौटुंबिक, सामाजिक, विनोदी, प्रबोधनात्मक असा बाज बाजूला ठेवून या नाटकाने रंगभूमीवर रहस्यमय प्रयोगाची गुंफण केली आहे. ताजेपणा हे वैशिष्ट्य घेऊन आलेल्या या नाटकाने त्याच्या अंतिम चरणापर्यंत त्याचा मूळ बाज राखून ठेवला आहे. शेखर हा या कथेचा नायक आहे. एका चॅनेलवर सादर करत असलेल्या त्याच्या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता मिळत असली, तरी मनोरंजन क्षेत्रातल्या सोहळ्यांत मात्र त्याला पुरस्कारांनी कायम हुलकावणी दिलेली आहे. दुसरीकडे, त्याची पत्नी कांचन नैराश्याने ग्रासली असल्याने तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुराधा यांचे उपचार सुरू आहेत. त्यातच शेखरच्या शेजारी राहणारी नेहा या तरुणीचे शेखरशी काही संबंध असल्याचे आडवळणाने सूचित होत जाते. कांचनला या प्रकरणाचा पुरेपूर अंदाज आहे. दम्यान, एका पुरस्कार सोहळ्याला शेखर आणि कांचन निघायच्या तयारीत असताना, अनोळखी अशा सोनिया नामक तरुणीचा, कांचनला अनपेक्षितपणे मदतीसाठी फोन येतो आणि ‘छडा’मधल्या नाट्यात रंग भरू लागतो.
मती गुंग करत आणि अपेक्षित ठोकताळे हमखास चुकवत रसिकांना खिळवून ठेवणारी संहिता सुरेश जयराम यांनी लिहिली आहे. प्रचंड गतीने त्यांनी हा भूलभुलय्या विस्तारत नेला आहे. त्यामुळे रसिकांना विचार करण्यास अवधीही मिळत नाही. नाटकातले रहस्य आणि ताण वाढवण्याची हातोटी लेखकाला यात अचूक साधली आहे. सर्वसाधारणपणे हसतखेळत ताल धरणाऱ्या नाटकांचे दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले मंगेश कदम यांनी, या नाटकाच्या निमित्ताने त्यांचा दिग्दर्शकीय कायापालट केलेला दिसतो. संहितेला अपेक्षित असलेले नाट्य तर त्यांनी लाजवाब उभे केले आहेच; परंतु संहितेत नसलेल्या जागा अचूक हेरून त्यांनी रंगभूमीवर रंगवलेला हा खेळ अफलातून आहे. संशयाचा काटा सतत फिरवत ठेवण्याची कसरत त्यांनी पात्रांच्या माध्यमातून उत्तम साधली आहे.
अवघ्या चार कलाकारांच्या प्रयोजनातून हे नाट्य रंगभूमीवर फेर धरते आणि या चौघांनीही त्यांची जबाबदारी ओळखून अभिनयातून उत्तम ते देण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. रहस्याची तलवार रसिकांच्या माथ्यावर टांगती ठेवून या कलाकारांनी रंगवलेला हा खेळ व्यवस्थित जमून आला आहे. सौरभ गोखले (शेखर) याच्या भूमिकेला मुळातच अनेक कंगोरे आहेत आणि त्याने अभिनयातून ते अधिक टोकदार केले आहेत. चेहरा आणि मुखवट्याचे द्वंद्व त्याने नजाकतीने पेश केले आहे. रेश्मा रामचंद्र (कांचन) या गुणी अभिनेत्रीने, तिच्या भूमिकेची खोली अचूक समजून घेत त्यात गहिरे रंग भरले आहेत. स्वत:ला आलेले नैराश्य आणि त्यात नवऱ्याच्या वागणुकीचा होणारा जाच यातला मध्य साधत तिने हे पात्र साकारले आहे. नाटकाच्या थेट मध्यांतरात एन्ट्री घेणारी मानसी कुलकर्णी (डॉ. अनुराधा) हिने नाटकाचा दुसरा अंक स्वत:च्या ताब्यात घेत तिच्या अभिनयाचे उत्तम पैलू दाखवून दिले आहेत. वेदांगी कुलकर्णी (नेहा) हिने नाटकात अतिशय निरागसतेने, आपल्यामुळे यात काहीतरी वेगळे नाट्य घडू शकेल, अशी सतत जाणीव करून देण्याची भूमिका चांगली वठवली आहे.
प्रदीप मुळ्ये यांचे लाजवाब नेपथ्य हे या नाटकातले एक पात्र म्हणूनच भूमिका बजावते. नाटकाची प्रकाशयोजनाही त्यांनीच केली आहे. रहस्यमय नाट्याशयाला आवश्यक असलेली गूढता त्यांनी या दोन्ही तांत्रिक अंगातून परिणामकारकतेने दृश्यमान केली आहे. राहुल रानडे यांचे संगीत चपखल आहे आणि पौर्णिमा ओक यांची वेषभूषा नेटकी आहे. ‘अवनीश प्रॉडक्शन्स’ने हे नाटक रंगभूमीवर आणून गूढरम्यता आणि रहस्यात धुंद होऊ इच्छिणाऱ्या नाट्यरसिकांच्या पोटात या मेजवानीतले चार घास जास्तच जातील, असे ताट सजवले आहे.

Web Title: Fraudulent intrigue ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.