फूड इज द रिअल हीरो
By Admin | Updated: September 26, 2016 01:39 IST2016-09-26T01:39:42+5:302016-09-26T01:39:42+5:30
झोरावर कलरा यांची भारतात अनेक हॉटेल असून, दुबईमध्येही नुकतेच त्यांनी एक हॉटेल सुरू केले आहे.

फूड इज द रिअल हीरो
झोरावर कलरा यांची भारतात अनेक हॉटेल असून, दुबईमध्येही नुकतेच त्यांनी एक हॉटेल सुरू केले आहे. त्यांच्या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे मिळणाऱ्या भारतीय पदार्थांना एक मॉडर्न टच दिलेला असतो. आपल्या हॉटेल व्यवसायातून वेळ काढून झोरावर मास्टरशेफ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहेत. झोरावर यांच्या या नव्या इनिंगबाबत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...
आज भारताच्या विविध भागांत तुमची हॉटेल आहेत. तुमच्या हॉटेलना खवय्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला?
- माझे वडील जिग्गस कलरा यांनी अनेक फाईव्ह स्टार हॉटेल्साठी कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. माझ्या वडिलांमुळे मला लहानपणापासून हॉटेलविषयी आकर्षण निर्माण झाले. मी लहान असताना आम्ही वर्षातून एकदा तरी वेगळ्या देशात फिरायला जात असू. तिथल्या स्थानिक जेवणाचा आनंद घेत असू. त्यामुळे मला खूपच कमी वयात वेगवेगळ्या देशांतील डिशेस कळल्या. मी १२-१३ वर्षांचा असतानाच मलाही माझे हॉटेल सुरू करायचे आहे, असे मी ठरविले. यासाठी मी बोस्टनमध्ये जाऊन एमबीए केले आणि दिल्लीत माझे पहिले हॉटेल सुरू केले.
पहिले हॉटेल सुरू करताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
- आजची आणि दहा वर्षांपूर्वीची परिस्थिती खूपच वेगळी होती. पूर्वी लोक महिन्यातून एकदा किंवा सहा महिन्यांतून एकदा आपल्या कुटुंबीयांसोबत बाहेर जेवायला जात असत. तसेच, मित्रमैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये खाण्याचे प्रमाणही खूप कमी होते. या सगळ्यात कोणतेही हॉटेल सुरू करणे ही एक रिस्क असायची, पण मी ती स्वीकारली. हॉटेलच्या पहिल्या दिवसापासूनच मी लोकांना काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला. आपले भारतीय पदार्थ, पण त्याला थोडासा मॉडर्न टच दिला. त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला.
सध्या तुमचे काम आणि कार्यक्रमाचे चित्रीकरण यांचा ताळमेळ कसा घालत आहात?
- मी माझ्या कामात खूप व्यग्र असल्याने कार्यक्रमाचे चित्रीकरण सांभाळून सगळ्या गोष्टी कशा करणार, याचे मला सुरुवातीला टेन्शन आले होते. पण, आता माझ्या टीमने सगळ्या गोष्टी सांभाळून घेतल्या असल्याने मला हॉटेलमध्ये तितकेसे लक्ष द्यावे लागत नाही. चित्रीकरण सुरू असताना तीन महिन्यांत पाच रेस्टॉरंट सुरू करण्याचे आमचे ठरले होते. त्यांतील दोन रेस्टॉरंट सुरूही झाली आहेत. माझ्या टीममुळेच मला या कार्यक्रमात परीक्षण करणे शक्य झाले आहे.
‘मास्टरशेफ’ या कार्यक्रमात तुम्ही परीक्षण करताना कोणत्या गोष्टीला अधिक महत्त्व देणार आहात?
- कोणताही पदार्थ खाण्याआधी आपण तो पाहतो. त्यामुळे पदार्थाच्या प्रेझेंटेशनला खूपच महत्त्व असते. मी चव आणि प्रेझेंटेशन या दोन्ही गोष्टी ध्यानात ठेवूनच परीक्षण करणार आहे. आज मास्टरशेफसारख्या कार्यक्रमाने शेफना सेलिब्रेटी स्टेटस मिळवून दिले आणि अशा कार्यक्रमाचा मी भाग बनलो, याचा मला अभिमान आहे. यंदाचा सीझन खूपच वेगळा असेल. भारताप्रमाणे इतर अनेक देशांतही आम्ही कार्यक्रमाचे चित्रीकरण करणार आहोत. या सीझनला कोणताही परीक्षक अथवा स्पर्धक कार्यक्रमाचा हिरो नसून जेवण हाच कार्यक्रमाचा हिरो असेल.