रहस्य आणि रोमांचित दृश्यांनी भरलेला
By Admin | Updated: January 23, 2015 23:28 IST2015-01-23T23:28:16+5:302015-01-23T23:28:16+5:30
ए वेनस्डे आणि ‘स्पेशल २६’ अशा वेगळ्या आशयाचे चित्रपट करून प्रेक्षक तसेच समीक्षकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण करणारे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ‘बेबी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.

रहस्य आणि रोमांचित दृश्यांनी भरलेला
ए वेनस्डे आणि ‘स्पेशल २६’ अशा वेगळ्या आशयाचे चित्रपट करून प्रेक्षक तसेच समीक्षकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण करणारे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ‘बेबी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दहशतवाद आणि त्याला सडेतोड उत्तर देणाऱ्या गुप्तचर विभागातील धडाकेबाज तरुणाची ही कथा आहे. दहशतवादाच्या याच आशयावर बेबीची कथा बेतलेली असून, रहस्य आणि रोमांचित होण्याच्या गरजा पूर्ण करण्यात तो यशस्वीही ठरला आहे.
अजय (अक्षय कुमार) हा देशातल्या एका गुप्तचर यंत्रणेबरोबर काम करतो. त्याला पत्नी (मधुरिमा तुली) आणि दोन मुले आहेत. देशात एकीकडे सगळे सुरळीत चालू आहे. पण देशातली एकता आणि सुरक्षेला सुरुंग लावण्याचे काम देशविदेशातल्या दहशतवादी संघटना करीत असतात. त्या संघटनांचा बीमोड करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी फिरोज (डॅनी) यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली जाते. या स्पेशल टीमचे नाव ‘बेबी’ ठेवले जाते. या टीममध्ये सामील होत आपल्या जिवाची पर्वा न करता अजय दहशतवाद्यांना धडा शिकवण्यात यशस्वी ठरतो.
वैशिष्ट्ये - नीरज पांडे यांनी लेखनाबरोबरच उत्तम पटकथा तयार केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच दृश्ये वेगाने पुढे सरकतात आणि प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरतात. तसेच चित्रपटावर आपले पूर्ण नियंत्रण ठेवण्यातही नीरज आणि टीम यशस्वी ठरली आहे. उत्तरार्धात तर चित्रपटाने खरी मजा आणली आहे. चित्रपटाच्या शेवटच्या २० मिनिटांत रहस्य आणि रोमांचकतेचा उत्तम आविष्कार पाहायला मिळतो. नीरज पांडेचे लेखन, दिग्दर्शन तसेच अक्षय कुमारच्या संतुलित अभिनयाने चित्रपट वेगळ्या उंचीवर पोहोचतो. खूप कालावधीनंतर अक्षयने अत्यंत चांगली भूमिका केली आहे. त्याच्या करिअरमधील आजवरच्या भूमिकांमधली ही भूमिका उत्कृष्ट म्हणून गणली जाईल. अक्षय कुमारबरोबरच अनुपम खेर, राणा दुग्गपती यांनीही चांगली कामे केली आहेत. तर अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत मधुरिमा तुलीही प्रभाव पाडते. तर बेबी मिशनचे चिफ म्हणून डॅनीनेही चांगली भूमिका केली आहे. खलनायकाच्या भूमिकेत के.के. मेननही लाजवाब. तर सुशांत सिंहने चांगले काम केले आहे. पाकिस्तानी दहशतवाद्याच्या भूमिकेतील रशीदजादाचा अभिनय शानदार आहे. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट उत्कृष्ट आहे. तर इस्तांबुल, नेपाळ, अबुधाबी येथील निसर्ग उत्कृष्टपणे पडद्यावर साकारणारे कॅमेरामन सुदीप चॅटर्जी कौतुकास पात्र आहेत. निरज पांडे रहस्य व रोमांचित दृश्यांनी भरलेला एक चांगला चित्रपट देण्यात यशस्वी ठरले आहेत.
उणिवा - चित्रपटात जास्त उणिवा नसल्या तरी पूर्वार्धात थोडा भरकटतो, असे वाटते. तापसी पन्नूची भूमिकाही गोंधळलेली वाटते. तिला ज्याप्रमाणे अचानक दाखवण्यात आले त्याप्रमाणे अचानक ती गायबही होते. गाणी आणि संगीतात मात्र चित्रपट कमी पडतो.