सैराट चित्रपटाच्या पायरसी प्रकरणी गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 5, 2016 11:16 IST2016-05-05T09:56:26+5:302016-05-05T11:16:18+5:30
सैराट चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लिक झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पहिला गुन्हा दाखल केला आहे

सैराट चित्रपटाच्या पायरसी प्रकरणी गुन्हा दाखल
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 05 - सैराट चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लिक झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पहिला गुन्हा दाखल केला आहे. पुण्याच्या स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्यातला हा पहिलाच गुन्हा असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील दुकानदाराविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दुकानदार सैराट चित्रपटाची पायरेटेड कॉपी विकत असताना रंगेहाथ अटक करण्यात आली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लिक झाल्याची तक्रार केली होती.
कासम दस्तगीर शेख असं अटक करण्यात आलेल्या दुकानदाराचं नाव आहे. कासमचं स्वारगेट परिसरात मोबाईल दुरुस्तीचं दुकान आहे. शंभर रुपयात मोबाईल किंवा सीडीवर सैराट सिनेमाच्या पायरेटेड कॉपी कासीम डाऊनलोड करुन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
सैराट चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असताना त्यालादेखील पायरसीचं ग्रहण लागलं आहे. अनेकांच्या मोबाईलवर हा चित्रपट आल्याने रेकॉर्डब्रेक कमाई करणा-या सैराटला फटका बसू शकतो. याप्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे. सैराटने तीन दिवसात तब्बल 12.20 कोटींचा गल्ला जमवला आहे.