हरवलेल्या नात्यांमधील हलकीफुलकी लव्हस्टोरी
By Admin | Updated: July 29, 2016 02:29 IST2016-07-29T02:29:21+5:302016-07-29T02:29:21+5:30
हरवलेल्या नात्यांना पुन्हा नव्याने शोधण्याचा प्रयत्न करणारी कहाणी लॉस्ट अॅन्ड फाऊंड या सिनेमाच्यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नेहमीच व्हर्साटाईल भूमिकांमधून

हरवलेल्या नात्यांमधील हलकीफुलकी लव्हस्टोरी
हरवलेल्या नात्यांना पुन्हा नव्याने शोधण्याचा प्रयत्न करणारी कहाणी लॉस्ट अॅन्ड फाऊंड या सिनेमाच्यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नेहमीच व्हर्साटाईल भूमिकांमधून समोर येणारी स्पृहा जोशी या चित्रपटातदेखील अनोख्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्यासंदर्भात स्पृहाशी सीएनएक्सने साधलेला हा मनमोकळा संवाद खास तुमच्यासाठी...
या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- खरं तर आम्ही जेव्हा कोणताही चित्रपट करतो तेव्हा त्यातील भूमिका ही वेगळीच असते. तशीच एक हटके भूमिका या चित्रपटात माझी आहे. पण ती एकदमच वेगळी अशी म्हणता येणार नाही. नैना हे कॅरेक्टर मी या चित्रपटात साकारत आहे. ज्या मुलीने तिचे आयुष्यच गमावले आहे, तिच्यापुढे काहीच उरले नाही. मग यातून बाहेर पडण्यासाठी ती काय करते, अशा स्वरूपाची ही भूमिका आहे.
या चित्रपटासाठी तू गीतकार म्हणूनदेखील काम केले आहेस, हे कसे जुळून आलंय?
- आधी माझ्याकडे हा चित्रपट आला आणि नंतर आमच्या संगीतकाराने या चित्रपटात गाणी लिहिण्यासाठी विचारले. यामध्ये माझ्या कॅरेक्टरच्या म्हणजेच नैनाच्या पॉर्इंट आॅफ व्ह्यूने मी दोन गाणी लिहिली आहेत आणि माझ्यावर कोणत्याही प्रकारचे प्रेशर गाणी लिहिण्यासाठी टाकले नाही. मला पूर्ण स्वातंत्र्य होते. शूट करतानाच मी गाणी लिहिली. दिवसा शूट अन् रात्री हॉटेलवर पोहोचल्यावर लिहिणे हे काम सुरूच होते. आभास हे अन् जुनेच सारे ही गाणी मी लिहिलीय. हा चित्रपट एक सुंदर म्युझिकल अल्बमच आहे.
चित्रपट एकटेपणावर भाष्य करतो, तर तुला वैयक्तिक आयुष्यात कधी एकटेपणा आलाय का?
- सुदैवाने मला असा अनुभवच कधी आला नाही. मी छान कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. आजूबाजूला सतत मित्र-मैत्रिणी असायच्या. मग त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी मी शेअर करायचे. त्यामुळे एकटेपणा कधी आलाच नाही. जर नैनासारखी परिस्थिती माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधी आली तर तिच्यासारखी सेन्सिबल मी वागू शकले असते का, हा प्रश्नच आहे.
या सिनेमात तुम्ही जशी डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी लोकांची मदत करता तसे काही वैयक्तिक आयुष्यात करशील का?
- आम्ही या सिनेमात अॅन्टी लोनलीनेस प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांचे प्रॉब्लेम्स सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. मला स्वत:ला एकटीला जगायला आवडत नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीला माझी गरज असेल तेव्हा मी नक्कीच जाऊन त्यांचा प्रॉब्लेम आधी ऐकेल अन् मग तो सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
या सिनेमातील भूमिका साकारताना तुला काय शिकायला मिळाले?
- प्रत्येक भूमिकाच कलाकाराला काही ना काही देत असते. शिकवित असते. तसेच मी हा चित्रपट करताना अनेक गोष्टी जवळून अनुभवल्या. मी जरी कधी एकटी पडली नसले तरी एकाकी आयुष्य जगणाऱ्यांच्या वाटेला काय दु:ख असते, याची जाणीव झाली. त्यामुळे मी ठरविले आहे, की आता यापुढे समोरच्या माणसाचे बोलणे आधी ऐकून घ्यायचे. त्यांच्या अडचणी काय आहेत, हे समजून घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा समोरच्याला आपली गरज असते तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून घेणे जास्त महत्त्वाचे असते.
- priyankalondhe@lokmat.com