फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 07:09 IST2025-10-05T07:09:25+5:302025-10-05T07:09:49+5:30
फरहान यांच्या आई आणि प्रसिद्ध पटकथालेखिका हनी इराणी यांच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डांचा गैरवापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या कुटुंबाच्या विश्वासू ड्रायव्हरने १२ लाख रुपयांची फसवणूक केली. त्याने फरहान यांच्या आई आणि प्रसिद्ध पटकथालेखिका हनी इराणी यांच्या नावावर असलेल्या क्रेडिट कार्डांचा गैरवापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ड्रायव्हरने ३५ लिटर टाकीची क्षमता असल्याच्या वाहनात ६२१ लिटर इंधन भरल्याचे बिल दिले होते. त्यामुळे हे बिंग फुटले.
फसवणूक प्रकरणात ड्रायव्हरला वांद्र्यातील एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची मदत होती, असा संशय आहे. इंधन भरण्यासाठी वापरायच्या कार्डांचा वापर खऱ्या इंधनासाठी न करता, त्या कार्डांवर सतत स्वाईप करून ड्रायव्हरने रोख रक्कम घेतली. मात्र १ ऑक्टोबर रोजी जेव्हा हनी इराणी यांचा मॅनेजर दिया भाटिया (३६) यांनी इंधन खर्च तपासताना अनियमितता लक्षात घेतली. पोलिस तक्रारीनुसार, ३५ लिटर डिझेल टाकी असलेल्या वाहनासाठी तब्बल ६२१ लिटर इंधन भरल्याची नोंद होती. ही आकडेवारी बघून भाटिया यांना शंका आली आणि त्यांनी अधिक तपास सुरू केला.
इराणी यांचा ड्रायव्हर नरेश सिंग (३५) आणि वांद्रा लेकजवळील पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी अरुण सिंग (५२) अशी आरोपींची नावे आहेत. नरेशने फरहान यांच्या नावावर नोंद असलेल्या तीन वेगवेगळ्या कार्डांचा वापर करून बनावट व्यवहार केले. अरुणला प्रत्येक व्यवहारात १००० ते १५०० रुपये त्याचा वाटा कापून उर्वरित रक्कम नरेशला देत होता.
माजी चालकाकडून मिळाले क्रेडिट कार्ड
नरेश याने गुन्हा कबूल केला आहे. एफआयआरनुसार, त्याने सांगितले की २०२२ मध्ये फरहान यांचा माजी ड्रायव्हर संतोष कुमारकडून त्याला हे कार्ड मिळाले होते आणि त्यानंतर तो अरुणसोबत मिळून सतत बनावट व्यवहार करत होता. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.