डॉ काशिनाथ घाणेकरांचा आज जन्मदिन...
By Admin | Updated: September 14, 2016 10:25 IST2016-09-14T10:25:13+5:302016-09-14T10:25:13+5:30
काशिनाथ घाणेकर मुळचे चिपळूणचे . लहानपणी अत्यंत हूड असे घाणेकर रामोश्यांची घोडी घेऊन गावातून सुसाट पळवत असत.

डॉ काशिनाथ घाणेकरांचा आज जन्मदिन...
.
समीर सप्रे, ऑनलाइन लोकमत,
(१४ सप्टेंबर१९३२ -मृत्यू: २ मार्च १९८६)
काशिनाथ घाणेकर मुळचे चिपळूणचे . लहानपणी अत्यंत हूड असे घाणेकर रामोश्यांची घोडी घेऊन गावातून सुसाट पळवत असत. यांचा नाटकातील अभिनय पहाण्याचे भाग्य लाभले नाही.. परंतु अशा राजबिंड्या कलाकाराच्या आठवणी देखील सुखद असतात...
मराठी रंगभूमीला लाभलेला एक अनमोल हिरा म्हणजे स्व. काशीनाथ घाणेकर ! अत्यंत देखणं व्यक्तीमत्व आणि तितकाच समर्थ अभिनय ! सहज आठवायचं म्हटलं तर घाणेकरांची कितीतरी सुपहिट नाटकं आपल्याला आठवतात . आज मला तुम्हाला, माझ्या मनात जणू घर करून बसलेली एक आठवण सांगायचीय .
(आनंद माडगुळकर)
असाच काशिनाथ घाणेकर नायक असलेल्या एका नाटकाचा प्रयोग . स्थळ बालगंधर्व रंगमंदिर . नाटकात काशिनाथ असल्यामुळे ते हाउसफुल्ल होतं हे वेगळं सांगायला नकोच ! तसं नाटक फारसं गाजलेलं नव्हतं . सुरूंग किंवा असंच काहितरी त्या नाटकाचं नाव असावं . पण त्यातल्या नायकाच्या भूमिकेत घाणेकर हळूहळू रंग भरत होते . पण नंतर त्यांचा अभिनय विलक्षण आक्रमक होत गेला. प्रेक्षक एव्हाना त्यांच्या केंव्हाच ताब्यात गेले होते . काशिनाथ त्यांच्या थोड्याश्या आक्रस्ताळ्या आविर्भावाने प्रेक्षकांच्या भावनांशी लीलया खेळत होते .त्या दिवशी पहिल्या रागेत बसून हा प्रयोग पहात होतो . माझ्याच रांगेत काही खुर्च्या सोडून विख्यात संगीतदिग्दर्शक सी . रामचंद्र बसलेले होते .
संपूर्ण नाटकाचं वळण बदलणारी एक भलंमोठं स्वगत घाणेकर बोलू लागले . त्यांच्या गळ्याच्या शिरा ताणल्या गेल्या . डोळ्यात कधी अंगार फुलायचा तर कधी मूर्तीमंत कारूण्य प्रगटायचं सर्व ताकद एकवटून ते आवाज फेकत होते . जणू त्यांची सर्व प्राणशक्ती त्यांच्या चेहेर्यावर एकवटली होती. माझ्या झरकन मनात आलं देव न करो पण हे इतकी ताकद लावताहेत कि न जाणो त्यातच त्यांच्या जिवाला काही बरंवाईट व्हायचं . माझ्या मनात हा विचार उमटतोय एव्हढ्यात पहिल्या रांगेत बसलेले सी. रामचंद्र गहिवरलेल्या आवाजात ओरडले " अरे ! एव्हढी ताकद लावली तर मरेल रे हा ! क्षणभर सारं सभागृह अवाक झालं पहिल्या रांगेत बसलेल्या मला तर काशिनाथजींच्या गहिर्या डोळ्यात अश्रू चमकल्याचा भास झाला . सुदैवाने काही अपप्रसंग न घडता नाटक संपलं .रात्री माझ्या मनात मात्र एका मनस्वी कलावंतानं दुसर्या मनस्वी कलावंताला दिलेली ती जगावेगळी दाद घुमत होती .
नाटय व सिनेसृष्टीतील कलाकारांच्या स्मृतीही बोलक्या वाटतात. 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाच्या शतकमहोत्सवी प्रयोगाला मा. यशवंतरावजी चव्हाण उपस्थित होते. नाटक संपल्यावर रंगपटात जाऊन त्यांनी संभाजीची भूमिका करणारे डॉ. काशिनाथ घाणेकर यांना 'वा! शंभूराजे' म्हणत मिठीत घेतले. डॉ. घाणेकर याबाबत लिहितात की, 'शब्दाची गरज भासू नये इतकी ती कृती बोलकी होती.'
विनम्र अभिवादन