'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:51 IST2025-10-01T09:50:33+5:302025-10-01T09:51:02+5:30
Deepika Padukone : बॉलिवूडची क्वीन दीपिका पादुकोणने पुन्हा एकदा आपल्या दमदार शैलीने लक्ष वेधून घेतले आहे. अलिकडेच दीपिकाला 'कल्कि एडी २८९८' या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
आयएमडीबीने (IMDb) गेल्या २५ वर्षातील भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेल्या व्यक्तींची यादी अलिकडेच जाहीर केली. यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले. दीपिका म्हणाली की, तिला वारंवार सांगितले जायचे की एक महिला म्हणून तिने आपल्या करिअरचा मार्ग कसा निश्चित करावा, पण तिने सध्याच्या स्थितीला आव्हान देण्यास कधीही भीती बाळगली नाही. ती प्रत्येक परिस्थितीला स्वतःच्या पद्धतीने हाताळते.
या यादीत शाहरुख खान पहिल्या स्थानावर, आमिर खान आणि हृतिक रोशन दुसऱ्या स्थानावर, आणि दीपिका पादुकोण तिसऱ्या क्रमांकावर राहिली. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले की, ''जेव्हा मी माझा प्रवास सुरू केला, तेव्हा मला अनेकदा सांगितले जायचे की यशस्वी होण्यासाठी एका महिलेने आपले करिअर कसे निश्चित करावे किंवा तिच्याकडून काय अपेक्षा ठेवली जाते, मात्र सुरुवातीपासूनच मी प्रश्न विचारणे, लोकांना नाराज करणे, कठीण मार्गावरून चालणे आणि सध्याच्या स्थितीला आव्हान देण्यापासून कधीही घाबरले नाही, जेणेकरून आपल्या सर्वांकडून ज्या चौकटीत बसण्याची अपेक्षा केली जाते, त्याला एक नवीन रूप देता येईल.''
चाहत्यांचे मानले आभार
यासोबतच दीपिका पादुकोणने तिच्या निर्णयांमध्ये तिच्या पाठीशी उभ्या राहिल्याबद्दल चाहत्यांचे आभारही मानले. दीपिका पुढे म्हणाली, ''माझ्या कुटुंबाने, चाहत्यांनी आणि सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्याने मला माझे निर्णय घेण्याची आणि निवड करण्याची हिंमत दिली आहे. मला आशा आहे की हा मार्ग येणाऱ्या पिढ्यांसाठी नेहमीच बदल घडवून आणेल. भारतीय चित्रपटसृष्टीच्या २५ वर्षांवरील आयएमडीबीचा हा अहवाल या विश्वासाला बळकट करतो की प्रामाणिकपणा, सत्यता आणि लवचिकता महत्त्वपूर्ण आहेत, आणि आपल्या मूळ तत्त्वांवर ठाम राहून बदल घडवून आणणे शक्य आहे.''
दरम्यान, अलfकडेच दीपिका पादुकोणला 'कल्कि एडी २८९८' या चित्रपटातून वगळण्यात आले होते. यानंतर तिने एका पोस्टमध्ये तिच्या निर्णयांवर ठाम राहण्याबद्दल सांगितले होते. यापूर्वी तिला संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट' चित्रपटातूनही काढून टाकण्यात आले होते.