दीपा करणार आईच्या भूमिकेतून कमबॅक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 03:01 IST2017-06-28T03:01:01+5:302017-06-28T03:01:01+5:30
मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावरचा गोंडस चेहरा दीपा परब लाँग ब्रेकनंतर पुन्हा एकदा रसिकांना भेटायला येत आहे.

दीपा करणार आईच्या भूमिकेतून कमबॅक!
मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावरचा गोंडस चेहरा दीपा परब लाँग ब्रेकनंतर पुन्हा एकदा रसिकांना भेटायला येत आहे. ‘अंड्याचा फंडा’ या तिच्या आगामी चित्रपटातून ती पुनरागमन करते आहे. ‘थोडी खुशी थोडा गम’, ‘छोटी माँ’, ‘मित’ आणि ‘रेत’ यासारख्या हिंदीच्या छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली दीपा आगामी चित्रपटात आईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मराठीचा सुपरस्टार अंकुश चौधरीशी विवाहबद्ध झाल्यानंतर दीपाने स्वत:ला अभिनय क्षेत्रापासून काही वर्षे दूरच ठेवले होते. मात्र, आई झाल्यानंतर ती पुन्हा एकदा जोमाने कामाला लागली आहे. लहानग्या ‘प्रिन्स’ची काळजी घेण्यापासून ते सिनेमाचे चित्रीकरण करण्यापर्यंत तिने केलेली तारेवरची कसरत खरीच कौतुकास्पदच म्हणावी लागेल! आई झाल्यानंतर एका आईची व्यक्तिरेखा साकारताना मला खूप मज्जा आली असल्याचे दीपा आपल्या सिनेमातील कॅरेक्टरबद्दल बोलताना सांगते. दिग्दर्शक संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा शालेय जीवनातील मैत्रीवर आधारित जरी असला तरी प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांना तो आपलासा करणारा आहे, या सिनेमाचा आशय आणि मांडणी खूप सुंदर असल्याचेदेखील ती पुढे सांगते. अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी निर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित या सिनेमाचे लिखाणदेखील दिग्दर्शक संतोष शेट्टी यांनी केले आहे. अंड्या आणि फंडा अशी या सिनेमातील दोन पात्रांची नावे असून, ही दोन पात्र अथर्व बेडेकर आणि शुभम परब या दोन बालकलाकारांनी साकारली आहे. तसेच त्यांच्या जोडीला मृणाल जाधव ही चिमुरडीदेखील असणार आहे. मैत्रीचा धम्माल पण तितकाच गूढ फंडा सांगणारा हा सिनेमा येत्या ३० जूनला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.