दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांची पुण्यतिथी.

By Admin | Updated: August 27, 2016 10:07 IST2016-08-27T10:07:08+5:302016-08-27T10:07:08+5:30

आनंद, अभिमान, चुपके चुपके असे एकाहून एक सरस चित्रपट देणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्व, दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांची आज (२७ ऑगस्ट) पुण्यतिथी.

Death anniversary of director Hrishikesh Mukherjee | दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांची पुण्यतिथी.

दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांची पुण्यतिथी.

>
संजीव वेलणकर
पुणे, दि. २७ - आनंद, गोलमाल,  अभिमान, चुपके चुपके, बावर्ची, खूबसुरत असे एकाहून एक सरस चित्रपट देणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्व, दिग्दर्शक  हृषिकेश मुखर्जी यांची आज (२७ ऑगस्ट) पुण्यतिथी.  दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे ते शिष्य होते. चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ३० सप्टेंबक १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला.
 
हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या चित्रपटांत कधीही स्थान दिले नाही. किंबहुना या गोष्टींना पूर्ण फाटा देऊन साध्या बाबींतूनही जीवनसूत्र सांगता येते, हेच त्यांनी त्यांच्या कलाकृतींतून दाखवून दिले आहे. हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे आपल्याला माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. पण पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी राजेश खन्ना यांना घेऊन 'आनंद' केला. दिग्दर्शक ही हृषदांची अर्धीच ओळख ठरेल. संकलक, लेखक, पटकथा लेखक, संगीतातले जाणकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करडया शिस्तीचा परंतु, अतिशय सहृदय माणूस, हे हृषदांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे हृषदा भागीदार आणि साक्षीदारही आहेत. बिमल रॉय यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक, गुलजार यांच्यासारखा मनस्वी कवी- लेखक, सलील चौधरी, सचिन देव बर्मन व पंचमदा ऊर्फ राहुल देव बर्मन, हेमंत कुमार, असे गायक संगीतकार, अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, अमिताभ बच्चन, उत्पल दत्त, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, रेखा, जया बच्चन अशा नव्या-जुन्या अनेक श्रेष्ठ कलावंतांबरोबर त्यांनी काम केले आहे. जया-अमिताभ ही जोडी काय किंवा रेखा, धर्मेंद्र, अमोल पालेकर, असरानी असे कलाकार काय, या कलाकारांच्या यशात हृषदांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे. २७ ऑगस्ट २००६ रोजी त्यांचे निधन झाले.
लोकमत समूहातर्फे मा.हृषिकेश मुकर्जी यांना आदरांजली. 
 
संदर्भ:- इंटरनेट

Web Title: Death anniversary of director Hrishikesh Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.