दयावान आणि शंकरचे एकाच दिवशी झाले निधन
By Admin | Updated: April 27, 2017 15:31 IST2017-04-27T15:31:00+5:302017-04-27T15:31:00+5:30
विनोद खन्ना आजारी असल्याच्या बातम्यांना पेव फुटले होते. मात्र आज त्यांचं निधन झालं आहे.

दयावान आणि शंकरचे एकाच दिवशी झाले निधन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - गेल्या काही दिवसांपासून विनोद खन्ना आजारी असल्याच्या बातम्यांना पेव फुटले होते. मात्र आज त्यांचं निधन झालं आहे. कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजाराशी ते अनेक दिवसांपासून झुंज देत होते. या आजारपणामुळे त्यांचे वजन कमी झाल्यानं त्यांना ओळखणेदेखील कठीण झाले होते. त्यांचा रुग्णालयात असतानाच एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हा फोटो पाहून त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र आज अखेरीस त्यांची जीवनयात्रा संपुष्टात आली आहे.
चित्रपटसृष्टीत काम करत असताना अनेक नायिकांसोबत विनोद खन्ना यांची जोडी गाजली होती. पण त्याच्याबरोबरच अनेक नायकांसोबतचीही त्यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी मुकद्दर का सिकंदर, परवरिश, हेरा-फेरी, अमर अकबर अँथोनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्या काळात त्यांना अमिताभ यांच्यापेक्षा अधिक मानधन मिळत असल्याचेदेखील म्हटले जाते. अमिताभ यांच्यासोबतच त्यांची फिरोज खान यांच्यासोबतची जोडीही प्रचंड गाजली. योगायोग म्हणजे 9 वर्षांपूर्वी याच दिवशी फिरोज खान यांचं निधन झालं होतं.
विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी कुर्बानी, शंकर शंभू, दयावान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचे कुर्बानी, दयावान सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले होते. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, ते दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि विशेष म्हणजे विनोद खन्ना यांचे निधन 27 एप्रिल 2017ला झाले तर फिरोज खान यांचे निधन बरोबर 9 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 27 एप्रिल 2009 ला झाले होते. कुर्बानी या चित्रपटातील इश्वर का दुसरा नाम दोस्ती है हा संवाद आज त्यांच्यासाठी तंतोतत खरा ठरला आहे.