Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:56 IST2025-09-16T09:54:37+5:302025-09-16T09:56:55+5:30
Dashavatar Movie Ticket Price: 'दशावतार' सिनेमाचं तिकीट आता ९९ रुपयांत मिळणार आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठीच असणार आहे. याबाबत सिनेमाच्या टीमकडून पोस्ट करण्यात आली आहे.

Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
Dashavatar Ticket Price: सध्या जिकडे तिकडे 'दशावतार' या मराठी सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे. प्रदर्शित होताच 'दशावतार'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. तीन दिवसांतच या सिनेमाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली. प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादानंतर 'दशावतार'च्या टीमकडून एक खास सरप्राइज देण्यात आलं आहे. 'दशावतार' सिनेमाचं तिकीट आता ९९ रुपयांत मिळणार आहे. पण ही ऑफर मर्यादित काळासाठीच असणार आहे. याबाबत सिनेमाच्या टीमकडून पोस्ट करण्यात आली आहे.
'दशावतार' सिनेमा मंगळवारी(१६ सप्टेंबर) प्रेक्षकांना फक्त ९९ रुपये तिकिटात पाहता येणार आहे. "फक्त 99/- रुपयात आपलं तिकीट बुक करा आणि अनुभवा नवरसांचा दशावतार..!", असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. काही शहरांमध्ये 'दशावतार' सिनेमाची ही ऑफर मंगळवारसाठी लागू होणार आहे. मात्र सिनेमाच्या तिकिटाचे दर कमी केल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिकिटाचे दर कमी करू नका, असं म्हटलं आहे.
"तिकीट आहे तेवढंच ठेवा...कमी का करताय? मी सिनेमा पाहिलाय..सोमवार असूनही खूप प्रेक्षक होते. चालतंय तसं चालू द्या", अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने "अरे तिकीट का कमी करताय...सिनेमा छान आहे", असं म्हटलं आहे. आणखी एकाने "ऑफर ठेवली चांगली गोष्ट आहे पण काही गरज नाही तिकीट कमी करायची. खूप दिवसांनी तगडा मराठी चित्रपट आलाय", अशी कमेंट केली आहे.
दरम्यान, 'दशावतार' सिनेमात दिलीप प्रभावळकर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात त्यांनी दशावतारी कलाकार बाबुलीची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थ मेनन, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर अशी 'दशावतार'ची स्टारकास्ट आहे. सुबोध खानोलकर यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.