काँग्रेस-स्वाभिमानीकडून राष्ट्रवादी ‘आऊट’

By Admin | Updated: April 7, 2015 01:16 IST2015-04-07T00:21:56+5:302015-04-07T01:16:29+5:30

प्रभाग समिती सभापती : महापालिकेत रंगले राजकारण; मंगळवारी होणार निवडी

Congress-self-respecting nationalist 'out' | काँग्रेस-स्वाभिमानीकडून राष्ट्रवादी ‘आऊट’

काँग्रेस-स्वाभिमानीकडून राष्ट्रवादी ‘आऊट’

सांगली : महापालिका प्रभाग समितीच्या सभापती निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने सोमवारी स्वाभिमानी आघाडीशी छुपी युती करून राष्ट्रवादीला चितपट करण्याचा डाव आखला. त्यामुळे मंगळवार, दि. ७ मार्च रोजी होणाऱ्या सभापती पदाच्या निवडीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही, तर आश्चर्य वाटणार नाही. दुसरीकडे स्वाभिमानी आघाडीची ताकद कमी असतानाही त्यांना एखादे सभापतीपद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत चार सभापती पदांसाठी एकूण नऊ अर्ज दाखल झाले. राष्ट्रवादीला एकही सभापतीपद मिळू नये, यासाठी आज काँग्रेसने स्वाभिमानी विकास आघाडीशी छुपी युती केली. प्रभाग समिती क्र. दोनच्या सभापती पदासाठी स्वाभिमानीच्या सदस्यांनी काँग्रेसला मदत करण्याचा आणि प्रभाग समिती क्र. तीनच्या सभापती पदासाठी काँग्रेसने स्वाभिमानीला मदत करण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या छुप्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसची ही खेळी राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीचे सदस्य सोमवारी नाराज दिसत होते.
सोमवारी सकाळपासूनच अर्ज दाखल करण्यावेळी पक्षीय स्तरावर राजकीय हालचालींना वेग आला होता. स्वाभिमानी आणि काँग्रेसचे सदस्य एकमेकांशी चर्चा करीत होते. दुपारी दीड वाजता सत्ताधारी गटनेते किशोर जामदार यांनी विठ्ठल खोत हे त्यांच्या नगरसेविका असलेल्या पत्नी संगीता खोत यांना घेऊन सत्ताधारी नेते मदन पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथे राजकीय खेळ्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रभाग समिती क्र. एक, दोन आणि चार ही तीन सभापदीपदे काँग्रेसने स्वत:कडे ठेवून समिती तीनचे सभापतीपद स्वाभिमानी आघाडीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभापती पदाच्या निवडीत एकही पद राष्ट्रवादीला येणार नाही, याची चोख व्यवस्था काँग्रेसने केली आहे. (प्रतिनिधी)

आज होणार निवडी
प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडी मंगळवारी सकाळी ११ वाजता होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर मतदान घेऊन निवडी जाहीर केल्या जातील.



दोघांना मुदतवाढ
काँग्रेसने प्रभाग समिती क्र. दोनच्या सभापती शकुंतला भोसले व समिती चारच्या सभापती मालन हुलवान यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी काँग्रेसकडून विद्यमान सभापतींनीच अर्ज दाखल केले आहेत. समिती क्र. एकचे सभापती काकडे यांच्याजागी सुनीता खोत यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

असे आहे गणित
समिती क्र. १ मध्ये १७ सदस्यसंख्या आहे. यातील ११ सदस्य काँग्रेसचे आहेत. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसला कोणतीही अडचण नाही. समिती क्र. दोन आणि तीनमध्ये काँग्रेस काठावर आहे. त्यामुळे स्वाभिमानी विकास आघाडीशी त्यांनी समझोता केला. समिती दोनमध्ये स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांनी काँग्रेसला, तर समिती ३ मध्ये काँग्रेसने स्वाभिमानीला मदत करण्याचे ठरले आहे.



समिती १ सभापती : सुनीता खोत (काँग्रेस), सुनील कलगुटगी (राष्ट्रवादी)
समिती २ सभापती: शकुंतला भोसले (काँग्रेस), अंजना कुंडले (राष्ट्रवादी), स्वरदा केळकर (स्वाभिमानी विकास)
समिती ३ सभापती : संगीता खोत (स्वाभिमानी विकास आघाडी), स्नेहा औंधकर (राष्ट्रवादी)
समिती ४ सभापती : मालन हुलवान (काँग्रेस), अल्लाउद्दीन काझी (राष्ट्रवादी)

Web Title: Congress-self-respecting nationalist 'out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.