लग्नाआधी Ex ला मिठी अन् व्हिडीओ व्हायरल, अखेर नवरीने सांगितलं 'त्या' रात्रीचं सत्य; नक्की काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:12 IST2025-12-24T16:11:55+5:302025-12-24T16:12:18+5:30
लग्नाआधी Ex ला मिठी मारून रडणाऱ्या 'त्या' नवरीने तोडले मौन! म्हणाली...

लग्नाआधी Ex ला मिठी अन् व्हिडीओ व्हायरल, अखेर नवरीने सांगितलं 'त्या' रात्रीचं सत्य; नक्की काय घडलं?
Bride Met Ex Before Wedding Viral Video Truth : तुम्ही सोशल मीडियावर असाल, तर हा व्हिडीओ तुम्हालाही दिसला असेल. नवरीच्या वेशभूषेत असलेली एक तरुणी कारमधून उतरते आणि थोडं दूर चालत जाऊन एका तरुणाला भेटते. याचा कारमध्ये बसलेला तिचा मित्र व्हिडीओ शूट करतो. लग्नाला दोन तास वेळ असताना ही तरुणी तिच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला आल्याचे तो सांगतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि तुफान व्हायरल झाला. अनेकांनी यावरून त्या तरुणीवर टीकेचा भडिमार केला. अनेकांनी त्या नवरीच्या भावी नवऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओची खरी गोष्ट आता समोर आली आहे. त्या नवरीने स्वत: समोर येत सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.
व्हिडीओमधील तरुणीचं नाव श्रुती दहूजा असं आहे. ती एक इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री आहे. ती फिल्म इंडस्ट्रीत प्रोडक्शन विभागातही काम करते. तिने स्पष्ट केले की सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ खऱ्या लग्नातील नव्हता, तर पूर्णपणे स्क्रिप्टेड व्हिडीओ होता. जो AARAV MAAVI या यूजरने त्याच्या @chaltePhirte098 या सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केला होता. श्रुतीने सांगितलं की, तिला शेवटच्या क्षणी नवरी म्हणून कास्ट करण्यात आले होते आणि व्हिडीओ काल्पनिक कंटेट म्हणून शूट करण्यात आला होता. तिने सांगितले की कंटेंट क्रिएटर आरव मावीने तिची संमती न घेता हा व्हिडीओ सार्वजनिक केला. यामुळं श्रुतीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. श्रुतीचं कुटुंबही विनाकारण वादात ओढलं गेलं.
श्रुती म्हणाली, "मी त्या व्यक्तीला म्हटलं की हा जो ड्रेस मी घातलाय, तो मला नीट होत नाहीये. त्यामुळे तू जेव्हा ही रील टाकशील तेव्हा प्लीज त्याआधी मला सांग कारण तो खूपच विचित्र दिसत असेल तर माझ्या कुटुंबाला त्रास होईल. माझं कुटंब नक्कीच त्याबद्दल बोलेल. तेव्हा तो मला म्हणाला की, 'तू काळजी करु नकोस, तू मुलगी आहेस मला कळतं. मी तुला एडिटिंग वगैरे करुन विचारुनच व्हिडीओ टाकेन'. पण त्याने मला न विचारताच व्हिडिओ अपलोड केला".
श्रुती म्हणाली, "माझ्या कुटुंबाला प्रचंड ट्रोल केले जात होते, म्हणून मी त्याला पुन्हा म्हणाले की तू प्लीज एक क्लॅरिफिकेशन करणारा व्हिडीओ शेअर कर. कारण, त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास होतोय. तर तो माझ्या मम्मीला पण म्हणाला की 'तुम्ही काळजी करु नका मी व्हिडीओ टाकेन, की ही एक केवळ अभिनेत्री आहे. तुम्ही ते सत्य मानू नका वगैरे'. मम्मीला पण ते खरं वाटलं. पण, जेव्हा त्याने तो व्हिडीओ शेअर केला, त्यात त्याने तसं काहीच सांगितलं नाही. माझा साधा उल्लेखही केला नाही. फक्त त्यानं व्हिडीओ स्क्रिप्टेड होता, एवढचं सांगितलं. त्याने मला या व्हिडीओचे पैसेही दिले नाही. मोफत काम करुन घेतलं. साधं कोलॅबही नाही केलं. आता मी जे काही सहन करतेय, त्यासाठी आपण माफी मागवी असंही त्याला वाटत नाहीये". आरवने या नुकसानीची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी श्रुतीने केली आहे.