जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:42 IST2025-11-08T13:42:09+5:302025-11-08T13:42:42+5:30
जरीन खान मुस्लिम कुटुंबातील असून हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, कारण आलं समोर

जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
हिंदी सिनेविश्वातून काल एक दु:खद बातमी आली. संजय खान यांची पत्नी जरीन खान यांचं निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. हृतिक रोशनची एक्स वाईफ सुजैन खान त्यांची मुलगी आहे. तर अभिनेता झायेद खान त्यांचा मुलगा आहे. जरीन खान यांच्या अंत्यसंस्काराला अनेक सेलिब्रिटी आले होते. तर काहींनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतची आठवण लिहून श्रद्धांजली वाहिली. दरम्यान जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याचं कारण आता समोर आलं आहे.
जरीन खान यांचा मुलगा झायेद खानने आईचे अंत्यसंस्कार केले. त्यांच्या अर्थीला मुलं आणि नातवंडांनी खांदा दिला. शेवटी झायेदने आईला अग्नी दिला. मात्र जरीन खान मुस्लिम असूनही त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का झाले असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर खूप कमी जणांना माहित आहे की जरीन खान या जन्माने हिंदू होत्या. जरीन कतरक असं त्यांचं लग्नापूर्वीचं नाव होतं. संजय खान यांच्याशी लग्न केल्यानंतरही त्यांनी धर्म बदलला नव्हता. म्हणून त्यांच्या इच्छेनुसारच त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा झायेद खानने आईची ही शेवटची इच्छा पूर्ण केली आईच्या पार्थिवाला अग्नी दिला.
जरीन या वयाच्या १४ व्या वर्षीच संजय खान यांना भेटल्या होत्या. १९६६ साली दोघांनी डेटिंगला सुरुवात केली आणि काही वर्षात त्यांनी लग्नही केलं. लग्नाआधी झरीन कत्रक या ६० च्या दशकातील प्रसिद्ध मॉडेल होत्या. 'तेरे घर के सामने','एक फूल दो माली' या सिनमांमध्ये त्यांनी काम केलं. आपल्या सौंदर्याने, चार्मिंग लूक आणि अभिनयाने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. लग्नानंतर त्या अभिनयापासून दूर गेल्या. इंटिरियर डिझाईन आणि होम डेकोरमध्ये त्यांनी काम केलं. झरीन यांनी कायम त्यांच्या लिखाणातून आपले विचार मांडले. त्यांनी अनेक वर्ष लाईफस्टाईल आर्टिकल्स लिहिले.