'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 08:55 IST2025-10-18T08:54:39+5:302025-10-18T08:55:30+5:30
वयाच्या २४ व्या वर्षी जायराने सुरु केली नवीन आयुष्याला सुरुवात

'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
'दंगल' या गाजलेल्या सिनेमात दिसलेली बालकलाकार अभिनेत्री जायरी वसीमचा निकाह झाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. जायराने सिनेमात छोट्या गीता फोगाटची भूमिका साकारली होती. नंतर काही सिनेमे केल्यानंतर २०१९ साली तिने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला आणि धर्माचा मार्ग स्वीकारला. आता जायराने वयाच्या २४ व्या वर्षी आता नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
जायरा वसीमने सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये ती निकाहनामा साईन करताना दिसत आहे. तिच्या हातावर मेहंदीचा गडद रंग चढलेला दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत ती आपल्या पतीसोबत उभी आहे. दोघंही आकाशात चंद्राकडे पाहत आहेत. यामध्ये जायराने लाल रंगाचा गोल्डन वर्क असलेला लेहेंगा घातला आहे. जायराने पतीचा चेहरा आणि ओळख मात्र उलगडलेली नाही. 'कुबूल है X3' असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
जायराच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. जायरा अगदी लहान वयातच अनेकांनी क्रश बनली होती. तिचं काश्मिरी सौंदर्य प्रेमात पाडणारंच होतं. २३ ऑक्टोबर २००० रोजी जायराचा जन्म झाला. वाढदिवसाच्या एक आठवड्याआधीच तिने निकाह झाल्याची बातमी शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला.
जायरा वसीम 'दंगल' सिनेमावेळी फक्त १६ वर्षांची होती. नंतर तिने 'सीक्रेट सुपरस्टार', 'द स्काय इज पिंक' या सिनेमांमध्येही काम केलं. ती मूळची श्रीनगरची आहे. जायराचे वडील जम्मू- काश्मीर बँकेत मॅनेजर होते. गेल्यावर्षी त्यांचं निधन झालं. तर जायराची आई शिक्षिका आहे.