"माझीच स्क्रीन टेस्ट घेतली, तिची नाही...", बॉलिवूडमधील दुटप्पीपणावर यामी गौतमची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:53 IST2025-12-26T11:52:18+5:302025-12-26T11:53:05+5:30
'काबिल' सिनेमाचा किस्सा सांगताना यामी म्हणाली...

"माझीच स्क्रीन टेस्ट घेतली, तिची नाही...", बॉलिवूडमधील दुटप्पीपणावर यामी गौतमची प्रतिक्रिया
अभिनेत्री यामी गौतमने हिंदू सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोणीही गॉडफादर नसताना तिने टॅलेंटच्या जोरावर तिने यश मिळवलं आहे. नुकताच तिचा 'हक' सिनेमा गाजला. याआधी तिने 'आर्टिकल ३७०','उरी', 'काबिल', 'विकी डोनर' हे हिट सिनेमे दिले. 'विकी डोनर' सिनेमानंतरही यामीला इंडस्ट्रीत स्वत:ला सतत सिद्ध करावं लागलं होतं. यावरुन तिने इंडस्ट्रीतील दुटप्पीपणावर भाष्य केलं आहे.
यामी गौतमने नुकतंच एका मुलाखतीत इंडस्ट्रीत होणाऱ्या पक्षपातीपणावर टीका केली. यावेळी तिने 'काबिल' सिनेमाचा किस्सा सांगितला. 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत यामी म्हणाली, "सुरुवातीला गोष्टी खूप कठीण होत्या. मला हे जमणार नाही असंच अनेकदा मला वाटायचं. मला परत गेलं पाहिजे का की संधीसाठी आणखी वाट पाहिली पाहिजे? असे प्रश्न मनात यायचे. हे असंच आहे का? आपल्यासोबतच का? असेही प्रश्न पडायचे. माझ्यासोबत दरवेळी असंच घडत आलं. अगदी विकी डोनर सिनेमानंतरही...मी अनेक गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले होते. प्रत्येक सिनेमा काहीतरी नवीन शिकवतो आणि तुम्ही आयुष्यात तो एक सिनेमा करण्यासाठी कधीच फिट नसता याची मला जाणीव झाली."
ती पुढे म्हणाली, "अनेकदा असं होतं की तुम्हाला तुमच्या टॅलेंटवर सिनेमे मिळत नाहीत. मी काबिल सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली. मला स्क्रीन टेस्ट देऊन आनंदही झाला. ते काबिलसाठीच होतं असं मी म्हणत नाही पण जेव्हा तुम्हाला स्क्रीन टेस्ट द्यायला सांगितलं जातं आणि तुमच्यासोबत आलेल्या दुसऱ्या अभिनेत्रीला मात्र स्क्रीन टेस्ट द्यावी लागत नाही तेव्हा मनात विचार येतो की हा फरक का?"
यामीचा नवरा आदित्य धर आहे ज्याने सध्या तुफान गाजत असलेल्या 'धुरंधर' सिनेमाचं दिग्दर्शन केलं. यामीने आदित्यच्या 'उरी' सिनेमात काम केलं होतं. तेव्हाच त्यांची ओळख झाली होती. मग ते हळूहळू प्रेमात पडले आणि २०२१ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना एक गोंडस मुलगा आहे ज्याचं नाव 'वेदविद' आहे.