भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे थिएटर्संना लागणार टाळं? जाणून घ्या अफवा आहे की खरं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:01 IST2025-05-10T16:00:09+5:302025-05-10T16:01:07+5:30
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील चित्रपटगृहे बंद होतील अशा अफवा सध्या पसरताना दिसते आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे थिएटर्संना लागणार टाळं? जाणून घ्या अफवा आहे की खरं
ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor)नंतर पाकिस्तानने भारतावर अनेक ड्रोन हल्ले केले, जे भारतीय सैन्याने पूर्णपणे हाणून पाडले. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे राजकुमार रावच्या 'भूल चुक माफ' या चित्रपटाचे थिएटर रिलीज रद्द करून ते थेट ओटीटीवर प्रसारित करण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त या चित्रपटाचे रिलीज रद्द करण्यात आले नाही तर आयपीएल देखील ७ दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, कोरोनाच्या काळाप्रमाणे थिएटर देखील बंद राहतील अशा अफवा पसरू लागल्या. परंतु या अफवेत कोणतेही तथ्य नाही.
बॉलिवूड हंगामाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले की, आज चित्रपटगृह मालक आणि मल्टीप्लेक्स मालकांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. बैठकीचा निकाल कळला नसला तरी, चित्रपटगृहे बंद करण्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. ही केवळ अफवा आहे. भुज, अमृतसर आणि चंदीगड सारख्या सीमावर्ती भागात ९ मे रोजी रात्रीचे शो होणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला होता. बिकानेर, श्री गंगानगर आणि जालंधर सारख्या शहरांमध्येही आजही रात्रीचे शो होणार नाहीत.
देशातील उर्वरित थिएटर राहणारेत सुरू
देशातील उर्वरित चित्रपटगृहे सुरू आहेत आणि रेड २ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत, ज्यावरून चित्रपटांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होत नसल्याचे सिद्ध होते. चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकिंग अजूनही सुरू आहे. बॉलिवूड हंगामाने दुसऱ्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, महामारीच्या काळात चित्रपटगृहे बंद पडल्यामुळे झालेल्या नुकसानातून आपण क्वचितच सावरलो आहोत. अशा परिस्थितीत, थिएटर बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही हे निश्चित आहे आणि व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू राहील.