अरबाज खाननंतर मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? म्हणाली- "मी तयार आहे, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:09 IST2025-12-30T15:09:29+5:302025-12-30T15:09:50+5:30
Malaika Arora And Arbaaz Khan : अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेक वर्षांनी मलायका अरोराने तिचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत.

अरबाज खाननंतर मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? म्हणाली- "मी तयार आहे, पण..."
मलायका अरोरा आणि अरबाज खान एकेकाळी बॉलिवूडचे 'पॉवर कपल' मानले जात होते, परंतु २०१७ मध्ये त्यांच्या घटस्फोटाने सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर अनेक वर्षांनी मलायका अरोराने तिचे प्रेम आणि लग्नाबद्दलचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत. जर आयुष्यात पुन्हा प्रेमाने हजेरी लावली, तर आपण त्याचा स्वीकार करू, असे अभिनेत्रीने म्हटले आहे. तसेच, घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगवरही तिने तीव्र संताप व्यक्त केला.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मलायका म्हणाली, "२०१६ मध्ये मी घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यावेळी केवळ सर्वसामान्य जनताच नाही, तर माझ्या जवळच्या मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनीही माझ्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मला खूप टोमणे मारण्यात आले, पण मला आनंद आहे की मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. आज मला कोणताही पश्चात्ताप नाही." ती पुढे म्हणाली, "त्यावेळी मला माहित नव्हते की पुढे काय होईल, काम मिळेल की नाही, लोक काय बोलतील. पण मला एवढे नक्की ठाऊक होते की, त्या नात्यातून बाहेर पडणे माझ्यासाठी गरजेचे होते. लोकांनी मला विचारले की, 'तू तुझ्या स्वतःच्या सुखाला इतके महत्त्व कसे देऊ शकतेस?' पण मला वाटले की स्वतःच्या आनंदासाठी हा निर्णय घेणे योग्यच होते."
पुरुषप्रधान मानसिकतेवर ओढले ताशेरे
पुरुषांच्या घटस्फोटावर समाज प्रश्न उठवत नाही, याकडे लक्ष वेधत मलायका म्हणाली, "दुर्दैवाने पुरुषांना कधीच असे प्रश्न विचारले जात नाहीत. आपण पुरुषप्रधान समाजात राहतो, जिथे पुरुषांच्या निर्णयांवर टीका होत नाही. पण स्त्रीने चौकटीबाहेर पाऊल टाकले की तिला 'आदर्श स्त्री' मानले जात नाही आणि तिच्यावर बोटे उचलली जातात."
"मी प्रेमाच्या शोधात नाही, पण..."
दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना मलायका म्हणाली, "माझा लग्नावर आजही विश्वास आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी लग्नाच्या मागे धावतेय. मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे. मी प्रेमाच्या कल्पनेवर प्रेम करते. जर नैसर्गिकरित्या माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम आले, तर मी त्याचा नक्कीच स्वीकार करेन. मी प्रेमासाठी तयार आहे, पण त्याच्या शोधात मात्र नाही."
तरुणींना दिला महत्त्वाचा सल्ला
मलायकाने सांगितले की, अरबाजसोबत लग्न झाले तेव्हा ती फक्त २५ वर्षांची होती. तिने आजच्या पिढीला सल्ला दिला की, "कमी वयात लग्न करू नका. आधी स्वतःचे आयुष्य भरभरून जगा, अनुभव घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नाचा विचार करण्यापूर्वी आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र व्हा."