परदेशातून परतल्यावर कृति खरबंदामध्ये दिसली कोरोनाची लक्षणं... राहातेय क्वॉरंटाईनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 14:10 IST2020-04-11T14:10:00+5:302020-04-11T14:10:01+5:30
कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने कृति प्रचंड घाबरली असून ती सध्या क्वॉरंटाईनमध्ये राहात आहे.

परदेशातून परतल्यावर कृति खरबंदामध्ये दिसली कोरोनाची लक्षणं... राहातेय क्वॉरंटाईनमध्ये
जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका अभिनेत्रीमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने तिने स्वतःला क्वॉरंटाईन करून घेतले आहे.
भारतात सध्या २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून सगळ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद व्हायच्या काही दिवसच आधी कृति खरबंदा परदेशातून भारतात परत आली असून ती गेल्या काही दिवसांपासून क्वॉरंटाईनमध्येच राहात आहे. कृतिला परदेशातून आल्यानंतर सर्दी, खोकला झाला होता. त्यामुळे तिला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची भीती तिला वाटायला लागली होती.
कृतिने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. कृतिने म्हटले आहे की, परदेशातून मी घरी परतले असता मला प्रचंड सर्दी, खोकला झाला होता. त्यावेळी तर भारतात कोरोनाची टेस्ट करण्याची किट देखील उपलब्ध देखील झालेली नव्हती. त्यामुळे माझ्या डॉक्टरांनी मला लक्षणं वाढतात आहेत का याकडे बारकाईने लक्ष द्यायला सांगितले आणि मला सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहाण्याबाबत सल्ला दिला. तीन दिवस माझी तब्येत खूपच खराब होती. या सगळ्यामुळे मला चांगलेच टेन्शन आले होते. मला कोरोनाची लागण झाली आहे असेच मला सतत वाटत होते. या सगळ्या टेन्शनमधून बाहेर पडण्यासाठी मी मेडिकेशनची मदत घेतली.
सध्या कृती आणि तिचा प्रियकर पुल्कित सम्राट एकाच बिल्डिंगमध्ये राहात असून तो तिची काळजी घेत आहे. यावर कृति सांगते, पुल्कित सध्या माझ्यासोबत असून यासारखी चांगली गोष्ट काय असू शकते... तो माझी प्रचंड काळजी घेत असून तो मला घरातील कोणतेच काम करून देत नाहीये. त्याच्यासारखा काळजी घेणारा कोणी प्रियकर असूच शकत नाही असे मला वाटते. मी सध्या त्याच्याकडून पियानो वाजवायला शिकत आहे.