आई-वडील विभक्त झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी केली नाही मदत, करिनाने केला खळबळजनक खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 19:40 IST2021-06-11T19:40:00+5:302021-06-11T19:40:02+5:30
करिना आणि करिश्मा या दोघीही त्यांच्या आईकडे राहिल्या तर रणधीर आपल्या आईसोबत राहात होते.

आई-वडील विभक्त झाल्यानंतर कपूर कुटुंबियांनी केली नाही मदत, करिनाने केला खळबळजनक खुलासा
अभिनेते रणधीर कपूर आणि बबिता यांनी लग्नाच्या काहीच वर्षांनंतर वेगळे व्हायचा निर्णय घेतला. रणधीर आणि बबिता यांनी कधीही घटस्फोट घेतला नसला तरी ते अनेक वर्षांपासून वेगळे राहात आहेत. करिना आणि करिश्मा या दोघीही त्यांच्या आईकडे राहिल्या तर रणधीर आपल्या आईसोबत राहात होते. आई-वडील वेगळे झाल्यानंतर आम्हाला कपूर कुटुंबियांतील कोणीच आर्थिक मदत केली नाही असा खळबळजनक खुलासा नुकताच करिना कपूरने केला आहे.
करिना कपूरने एका मुलाखतीत नुकतेच सांगितले आहे की, आमच्या आईने आम्हाला एकटीने सांभाळले. त्याकाळात कपूर कुटुंबियांकडून आम्हाला आर्थिक मदत मिळाली नाही. माझी आई काही ना काही काम करत राहायची. पैसे कमवण्यासाठी आईने रिअल इस्टेटचा व्यवसाय देखील केला होता. तिने घेतलेल्या मेहनतीमुळेच आम्हाला यश मिळाले. तेव्हा आम्ही वडिलांना खूपच कमी भेटायचो. पण आता आमच्यात सगळे काही चांगले आहे.
रणधीर आणि बबिता यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर बबिता यांनी चित्रपटात काम करणे बंद केले. पण लग्नाच्या काहीच वर्षांनंतर त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायला लागले.