अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध अभिनेत्यासाठी केलं होतं रक्तदान, 'शोले'मध्ये केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:08 IST2026-02-07T12:08:19+5:302026-02-07T12:08:56+5:30
अमिताभ बच्चन यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्याला रक्तदान करुन त्यांचे प्राण वाचवले होते. विशेष म्हणजे हा अभिनेता त्यांचा जवळचा मित्र असून बिग बींनी केलेल्या रक्तदानामुळे त्यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट झाली.

अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध अभिनेत्यासाठी केलं होतं रक्तदान, 'शोले'मध्ये केलंय काम
'बिग बी', 'शेरशाह', 'बच्चनसाब' अशा एक ना अनेक नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan). उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याचे आज इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनाही मदत केली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा असाच एक किस्सा गाजत आहे. अमिताभ बच्चन यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्याला रक्तदान करुन त्यांचे प्राण वाचवले होते. विशेष म्हणजे हा अभिनेता त्यांचा जवळचा मित्र असून बिग बींनी केलेल्या रक्तदानामुळे त्यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट झाली.
अमजद खानच्या गाडीचा झाला अपघात
द ग्रेट गँबलर या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. या सिनेमाचं गोव्यात चित्रीकरण सुरु होतं. सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अमजद खान गोव्याच्या दिशेने जात होते. मात्र, वाटेमध्येच त्यांच्या कारचा जबरदस्त अपघात झाला. या अपघातात अमजद खान गंभीर जखमी झाले.
अभिनेत्यासाठी बिग बी ठरले रक्तदाता
अमजद खान यांचा कार दुर्घटनेची माहिती मिळताच अमिताभ बच्चन सिनेमाचं चित्रीकरण अर्ध्यावर सोडून अभिनेत्याच्या दिशेने रवाना झाले. अमजद खान यांना जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी अमजद खान यांना रक्ताची तीव्र गरज होती. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा रक्तगट मॅच झाल्यामुळे त्यांनी लगेचच अमजद यांना रक्त देण्यास तयारी दर्शवली. बिग बींनी योग्य वेळी अमजद यांना रक्त दिल्यामुळे या अभिनेत्याचे प्राण वाचले. विशेष म्हणजे या घटनेनंतर अमजद आणि अमिताभ यांच्यातील मैत्री आणखीनच घट्ट झाली.आजही इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या मैत्रीचे किस्से गाजतात. दरम्यान, अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांनी 'शोले', 'कालिया', 'याराना', 'मुकद्दर का सिकंदर' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.