या कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये अनेक वर्षं होता अबोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 18:26 IST2021-01-27T18:23:18+5:302021-01-27T18:26:57+5:30
सलमान आणि शाहरुख यांचे भांडण का झाले होते याबाबत त्या दोघांनी कधीच मीडियात काहीही बोलण्यास नकार दिला होता.

या कारणामुळे शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये अनेक वर्षं होता अबोला
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आणि बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान यांच्यात एकेकळी खूप चांगली मैत्री होती. पण काही कारणांनी त्यांच्यात झालेल्या भांडणामुळे ते अनेक वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते. २००२ पासून सलमान आणि शाहरुख एकमेकांशी बोलत नव्हते आणि त्यात २००८ मध्ये त्यांच्यात प्रचंड भांडणं झाली होती.
सलमान आणि शाहरुख यांचे भांडण का झाले होते याबाबत त्या दोघांनी कधीच मीडियात काहीही बोलण्यास नकार दिला होता. पण मीडिया रिपोर्टनुसार सलमान आणि शाहरुख यांचे भांडण कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाले होते. कतरिनाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासूनच कतरिना आणि सलमानची खूप चांगली मैत्री आहे. तसेच शाहरुख आणि कतरिनाने जब तक है जान या चित्रपटात काम केले आहे. कतरिनाच्या २००८ मधील वाढदिवसाच्या पार्टीत सलमान आणि शाहरुख मध्ये इतकी भांडणं झाली होती की ते एकमेकांना मारायला धावले होते. पण कतरिना आणि गौरी खान यांनी मध्यस्थी करत हे भांडण थांबवले होते.
शाहरुखने एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, सलमानसोबत झालेल्या भांडणाबाबत मला आजही वाईट वाटते. अशी गोष्ट पुन्हा होऊ नये असे मला वाटते. सलमान सोबत भांडण झाल्यानंतर त्याबद्दल मी मुलांना काय सांगू असा मला प्रश्न पडला होता. मी त्यांना केवळ एवढेच सांगितले की, काही जणांसोबत कधीकधी आपले पटत नाही.
सलमान आणि शाहरुख यांचे पहिले भांडण २००२ मध्ये चलते चलते या चित्रपटाच्या सेटवर झाले होते. या चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. पण राणीच्या आधी या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायची निवड करण्यात आली होती. पण या चित्रपटाच्या सेटवर सलमानने हंगामा केल्यानंतर या चित्रपटात राणीची वर्णी लागली होती. सलमानने सेटवर प्रचंड गोंधळ घातला असल्याने शाहरुख आणि त्याची भांडणं झाली होती असे म्हटले जाते.