हृतिकचा 'वॉर २' की रजनीकांतचा 'कुली'? बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:22 IST2025-08-15T09:22:04+5:302025-08-15T09:22:25+5:30
वॉर २ आणि कुली हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. या दोन सिनेमांपैकी कोणी जास्त कमाई केली, जाणून घ्या

हृतिकचा 'वॉर २' की रजनीकांतचा 'कुली'? बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी
ऋतिक रोशन, ज्यु. एनटीआर आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘वॉर २’ हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ५२.५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘वॉर २’ हा यावर्षीचा सर्वात मोठी ओपनिंग केलेला चित्रपट ठरला आहे. ‘वॉर २’ने हिंदी भाषेत सुमारे २९ कोटींची कमाई केली, तर तेलुगू भाषेतून २३.२५ कोटी रुपये मिळाले. चित्रपटाच्या तमिळ आवृत्तीनेही काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळवला.
हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग आहे आणि त्याची ओपनिंग आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक मानली जात आहे. ‘वॉर’ (२०१९) आणि ‘पठाण’नंतर हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंग घेणारा ठरला आहे. दमदार अॅक्शन, मोठ्या स्टारकास्ट आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे हा चित्रपट पहिल्या दिवसापासून चर्चेत आला आहे.
‘वॉर २’ चित्रपटाची रजनीकांतच्या ‘कुली’ या चित्रपटाची थेट स्पर्धा आहे. ‘कुली’ने पहिल्या दिवशी तब्बल ६५ कोटींची कमाई करत ‘वॉर २’ पेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा रंगली आहे. काही समीक्षकांच्या मते, ‘वॉर २’ च्या कथानकात इतकी मजा नसली तरी अॅक्शन सीन्स आणि स्टार पॉवरमुळे प्रेक्षक थिएटरकडे ओढले जात आहेत. विशेषतः स्वातंत्र्यदिन आणि लागून येणाऱ्या सुट्ट्यांमुळे या चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण तरीही या दोन चित्रपटांपैकी रजनीकांतच्या 'कुली' चित्रपटानेच बाजी मारल्याचं दिसतं.
‘वॉर २’च्या पहिल्या दिवसाच्या आकड्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की प्रेक्षकांचा उत्साह प्रचंड आहे. आता पुढील काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा किती लवकर गाठतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऋतिक आणि जूनियर एनटीआर यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, चित्रपटाची अॅक्शन आणि भव्य दृश्ये ही त्याची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. दुसरीकडे कुली चित्रपटात रजनीकांत, आमिर खान, उपेंद्र, नागार्जुना, सौबिन साहिर यांची भूमिका असल्याने हा चित्रपटही पुढील काही दिवसात कशी कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे