वरुण धवनच्या घरी कुमारिका पूजन; फोटो शेअर करत म्हणाला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:09 IST2025-09-30T18:09:10+5:302025-09-30T18:09:56+5:30
वरुण धवनच्या घरी कुमारिका पूजन करण्यात आलं. याचे काही फोटो अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

वरुण धवनच्या घरी कुमारिका पूजन; फोटो शेअर करत म्हणाला....
सध्या नवरात्रीमुळे सगळीकडे उत्साहाचं आणि मंगलमय वातावरण आहे. आज ३० सप्टेंबर रोजी दुर्गा अष्टमीचा एक विशेष दिवस आहे. हा दिवस दुर्गा देवीच्या पूजेसाठी एक प्रमुख दिवस मानला जातो. या दिवशी दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. दुर्गा अष्टमीला घरोघरी कुमारिका पूजन केलं जातं. अनेक जण ही प्रथा आजही फॉलो करतात. कुमारिका असलेल्या छोट्या मुलींना घरी बोलवून त्यांना पूजलं जातं. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या घरीही कुमारिका पूजन करण्यात आलं. याचे काही फोटो अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
वरुण धवनच्या घरी दुर्गा अष्टमीचा शुभ सण मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याच्या घरी कन्या भोजन पार पडलं. मुलींसोबत बसून जेवण करतानाचे काही फोटो अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. वरुणने शेअर केलेल्या फोटोंमध्ये, तो पाच मुली आणि एका लहान मुलासोबत जमिनीवर बसलेला दिसत आहे. मुले हलवा, चणे आणि पुरी असे पदार्थ खाताना दिसली. वरुण धवनने या सुंदर फोटोंना कॅप्शन दिले, "दुर्गा अष्टमीच्या शुभेच्छा, सर्वोत्तम जेवण".
वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत जान्हवी कपूर, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ आणि मनीष पॉल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
नवरात्रीत कुमारिका पूजन का केलं जातं ?
अष्टमीला किंवा नवमीला कुमारिका पूजन म्हणजेच कन्या भोजन केले जाते, ज्यामध्ये कुमारी मुलींना देवीचे रूप मानून त्यांचे आदराने स्वागत केले जाते, त्यांना शक्य असल्यास हलवा-पुरी व चणे असे पदार्थ भरवले जातात आणि त्यानंतर त्यांचे पाय धुवून कपाळावर कुंकू लावून, त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा आदर केला जातो. या पूजनामुळे देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा होते. लहान मुलींना सर्वात शुद्ध मानले जाते, कारण त्यांच्यात कोणत्याही वाईट भावना नसतात. या पूजनाने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि दारिद्र्य दूर होते. यंदा नवरात्र २२ सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि नवमीचा सण उद्या साजरा होईल. २ ऑक्टोबर रोजी दसरा (विजयादशमी) सणाने नवरात्रीची सांगता होईल.