ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राणी मुखर्जीची घेतली भेट, काय विशेष कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:28 IST2025-10-09T11:25:49+5:302025-10-09T11:28:22+5:30
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मुंबईत यशराज फिल्म स्टुडिओला भेट दिल्यानंतर यश राज फिल्म्सच्या आगामी तीन सिनेमांविषयी मोठी घोषणा केली.

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राणी मुखर्जीची घेतली भेट, काय विशेष कारण?
UK PM Keir Starmer Meets Rani Mukerji: ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर सध्या दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध यश राज फिल्म्स (YRF) स्टुडिओला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील अनेक महत्त्वाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यश राज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी पंतप्रधानांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या भेटीदरम्यान ब्रिटिश पंतप्रधानांनी एक महत्त्वाची घोषणा केली.
ब्रिटिश पंतप्रधानांनी जाहीर केले की, २०२६ पासून ब्रिटनमध्ये यश राज फिल्म्सच्या तीन प्रमुख चित्रपटांचे शुटिंग सुरू होईल. ही भागीदारी रोजगार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक एकतेसाठी नवा अध्याय ठरणार आहे. या प्रकल्पांमुळे नव्या नोकऱ्या निर्माण होतील. म्हणजेच, फक्त सिनेमाच नाही तर अर्थव्यवस्थेलाही नवा वेग मिळणार आहे. यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला कोट्यवधी पौंडांचा फायदा होणार आहे.
यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी या करारावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "ब्रिटन नेहमीच आमच्यासाठी खास राहिलं आहे. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट ब्रिटनमध्ये शूट झाला होता. पंतप्रधान किअर स्टारमर यांनी आमच्या स्टुडिओला भेट देऊन या भागीदारीवर स्वाक्षरी करणे हा आमच्यासाठी सन्मान आहे". ब्रिटिश पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना नवी दिशा मिळणार आहे.