'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेचा नवीन सिनेमा 'मयसभा'ची घोषणा; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:01 IST2025-11-13T12:00:24+5:302025-11-13T12:01:44+5:30
तुंबाड सिनेमाचा दिग्दर्शक राही बर्वेच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमातील अभिनेत्याला ओळखलं?

'तुंबाड'चा दिग्दर्शक राही बर्वेचा नवीन सिनेमा 'मयसभा'ची घोषणा; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका
२०१८ साली 'तुंबाड' सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमातून बॉलिवूडला महाराष्ट्रात घडलेली एक अनोखी भयकथा अनुभवायला मिळाली. राही अनिल बर्वेने 'तुंबाड' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आता राहीच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा झाली. 'मयसभा' असं भन्नाट नाव राहीच्या या सिनेमाचं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून राहीने या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता दिसणार आहे.
'मयसभा' सिनेमात कोण झळकणार?
राही बर्वेने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर 'मयसभा' सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. या मोशन पोस्टरमध्ये एक म्हातारा माणूस तोंडावर मास्क लावून श्वास घेताना दिसतोय. हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे, जावेद जाफरी. अभिनेता जावेद जाफरी 'मयसभा' सिनेमा प्रमुख भूमिका साकारणार आहे. जावेद जाफरीचा लूक इतका जबरदस्त आहे की, त्याला ओळखताच येत नाहीये.
जावेद जाफरीसोबत या सिनेमात आणखी कोणते कलाकार झळकणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान अनेक वर्षांनी जावेदला बॉलिवूड सिनेमात प्रमुख भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. राहीची बहीण आणि नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरनेही हे पोस्टर शेअर केलंय.
''दशकभरापूर्वी, आम्ही एक वेडेपणा उघड केला - एक असा प्रयोग जो खूपच विचित्र आणि अगाध आहे. या प्रयोगाचं महत्व शब्दात सांगता येत नाही. अखेर हा शाप मोडला आहे. परमेश्वर खन्नाचे (जावेद जाफेरी) रहस्यमय जग अखेर प्रकाशात येणार आहे. सोन्यासाठी जो शोध सुरु होणार आहे, त्याचा आनंद घ्या.'', अशा शब्दात राही बर्वेने कॅप्शन लिहून 'मयसभा' सिनेमाविषयी माहिती दिली आहे. हा सिनेमा रिलीज कधी होणार, याची माहिती उपलब्ध नाही. पण 'तुंबाड'नंतर राही बर्वे 'मयसभा'च्या माध्यमातून नवीन भन्नाट कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार, हे निश्चित.