टायगर श्रॉफला लागली लॉटरी! आता थेट झळकणार हॉलिवूडमधील अॅक्शनपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 16:41 IST2025-10-02T16:41:34+5:302025-10-02T16:41:56+5:30
Tiger Shroff :आता प्रियांका आणि दीपिका पादुकोणनंतर 'बागी ४' अभिनेता टायगर श्रॉफ देखील हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

टायगर श्रॉफला लागली लॉटरी! आता थेट झळकणार हॉलिवूडमधील अॅक्शनपटात
अमरीश पुरींपासून ते अनुपम खेर, राधिका आपटे, अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि प्रियांका चोप्रासह अनेक कलाकारांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, फार कमी कलाकार असे आहेत, ज्यांनी बॉलिवूडप्रमाणे तिथेही आपली छाप पाडली आहे. सध्या प्रियांका चोप्रा ही एकमेव अशी स्टार आहे, जी तिच्या अभिनयाच्या बळावर हॉलिवूडमध्ये टिकून आहे. आता प्रियांका आणि दीपिका पादुकोणनंतर 'बागी ४' अभिनेता टायगर श्रॉफ देखील हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याला हॉलीवूड सिनेमातील दोन मोठ्या सुपरस्टार्ससोबत एका अॅक्शन चित्रपटाची ऑफर मिळाली आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, टायगर श्रॉफ ज्या दोन हॉलिवूड सुपरस्टार्ससोबत पहिल्यांदा चित्रपट करणार आहे, त्यापैकी एक गोल्डन ग्लोब अवॉर्ड विजेता अभिनेता आणि फिल्ममेकर सिल्वेस्टर स्टेलोन आहेत आणि दुसरे थाई मार्शल आर्ट्स एक्सपर्ट आणि 'फ्युरियस ७'चे अभिनेता टोनी जा आहेत.
रिपोर्ट्सनुसार, अमेझॉन एमजीएम एका अत्यंत महत्त्वाच्या पॅन वर्ल्ड प्रोजेक्टसाठी या तिन्ही कलाकारांशी बोलणी करत आहे. त्यांच्या सूत्रांनुसार, "अमेझॉन एमजीएम एक मोठा अॅक्शन चित्रपट बनवत आहे, ज्यात ते हॉलीवूड स्टार सिल्वेस्टर स्टेलोन, टोनी जा आणि टायगर श्रॉफ यांना एकत्र आणू शकतात. हा एक ग्लोबल प्रोजेक्ट आहे, ज्याला अनेक भाषांमध्ये बनवण्याचा निर्मात्यांचा विचार आहे."
भारतीय दिग्दर्शक करणार चित्रपटाचे दिग्दर्शन?
या रिपोर्टमध्ये पुढे असेही सांगण्यात आले आहे की, निर्मात्यांनी कलाकारांसोबत चर्चा सुरू केली आहे आणि टायगर, सिल्वेस्टर आणि टोनी जा या तिघांनीही या प्रोजेक्टचा भाग बनण्यास आपली उत्सुकता दर्शवली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान भारतीय दिग्दर्शकच सांभाळणार आहे आणि टायगर श्रॉफ त्याचे आयडॉल असलेल्या सिल्वेस्टर स्टेलोनसोबत आपला पहिला हॉलिवूड अॅक्शन चित्रपट करण्यास उत्सुक आहे. या अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपटाचे इतर तपशील निर्मात्यांनी सध्या गुलदस्त्यात ठेवले आहेत. टायगर श्रॉफ हा अक्षय कुमारनंतर सध्याच्या काळातील सर्वात मोठा अॅक्शन स्टार आहे. त्याच्या अखेरच्या रिलीज झालेल्या 'बागी-४' चित्रपटामध्ये अभिनेत्याचा जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाला होता.