"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:31 IST2025-05-19T16:31:02+5:302025-05-19T16:31:47+5:30
अभिनेता दया शंकर पांडे (Daya Shankar Panday) हा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत चालू पांडेची भूमिका साकारताना दिसला आहे. याआधी त्याने अनेक उत्तम चित्रपटात काम केले आहे.

"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
अभिनेता दया शंकर पांडे (Daya Shankar Panday) हा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय मालिकेत चालू पांडेची भूमिका साकारताना दिसला आहे. याआधी त्याने अनेक उत्तम चित्रपटात काम केले आहे. यामध्ये आमिर खानचा 'लगान', अजय देवगणचा 'गंगाजल' आणि शाहरुख खानचा 'स्वदेश' या सिनेमांचा समावेश आहे. अलिकडेच दयाने खुलासा केला की, एकदा आमिर खानमुळे त्याला नोकरी गमवावी लागली.
फ्रायडे टॉकीजच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना दया शंकर पांडेने त्याच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण केली. यादरम्यान त्याने सांगितले की, ''त्या काळात त्याला 'अकेले हम अकेले तुम' या चित्रपटात काम मिळाले होते. पण आमिर खानला वाटले की, यापेक्षा तो चांगल्या पात्रासाठी योग्य आहे आणि त्याने त्याचं पॅकअप केले.'' दया शंकर पांडे म्हणाले की, ''माझ्याकडे काम नव्हते. मी आर्थिक संकटाशी झुंजत होतो. माझ्या कुटुंबाने मला पाठिंबा देण्यास नकार दिला आणि मी स्वतः पैसे कमवण्याचा विचार केला. मी 'अकेले हम अकेले तुम' चित्रपटाच्या सहायक दिग्दर्शकाला सांगितले की, मला भूमिका द्या आणि म्हणून त्यांनी मला त्या चित्रपटात १२ दिवस काम दिले आणि मला दररोज २००० रुपये मिळत होते.''
दया सेटवर आमिर खानपासून राहायचा दूर
'तारक मेहता' चित्रपटातील अभिनेत्याने पुढे सांगितले की, ''आमिर खान त्याला आधीपासून ओळखत होता आणि तो त्याला एक चांगला अभिनेता मानत होता.'' तो म्हणाला, ''मी आमिर सरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचो जेणेकरून त्यांनी मला पाहू नये, पण एके दिवशी त्यांनी मला पाहिले आणि मला फोन केला आणि विचारले की मी तिथे काय करत आहे. जेव्हा मी सांगितले की मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. तेव्हा त्यांनी मन्सूर खान आणि सहायक दिग्दर्शकाला सांगितले, तो खूप चांगला अभिनेता आहे, त्याला बर्बाद करू नका.''
''त्यांनी माझं पॅकअप करून टाकलं''
दया म्हणाला की, ''मला हे कौतुक ऐकायचे नव्हते; कारण मला माझे रोजचे काम करून जायचे होते. त्यावेळी आमिर खान मला खलनायक वाटत होते. त्यांनी माझं पॅकअप करून टाकले.'' पुढे अभिनेत्याने सांगितले की, ''नंतर आमिर खान यांनी त्याला लगानमध्ये कास्ट केले आणि गुलाममधील भूमिकेसाठी त्याची शिफारसही केली.''