जीवाची पर्वा न करता इरफानने मित्राचा जीव वाचवला, तोच पुढे IPS झाला; आवर्जून वाचावा असा खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:46 IST2026-01-07T12:41:21+5:302026-01-07T12:46:02+5:30
इरफान खानची आज जयंती. त्यानिमित्ताने अभिनेत्याच्या जिगरी मित्राने हा खास किस्सा सर्वांना सांगितला आहे. त्यामुळे सर्व थक्क झाले आहेत

जीवाची पर्वा न करता इरफानने मित्राचा जीव वाचवला, तोच पुढे IPS झाला; आवर्जून वाचावा असा खास किस्सा
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता इरफान खानची आज ५९ वी जयंती आहे. इरफान खान केवळ त्यांच्या दमदार अभिनयासाठीच नाही, तर त्यांच्या दिलदार स्वभावासाठीही ओळखले जात. जयंतीनिमित्त इरफानच्या आयुष्यातील एक असा खास किस्सा समोर आला आहे, जो वाचून तुम्हालाही इरफानच्या व्यक्तिमत्वाला सलाम करावासा वाटेल. वाचा हा खास किस्सा
हा प्रसंग भरतपूरचे पोलीस अधीक्षक आणि आयपीएस अधिकारी हैदर अली जैदी यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. हैदर अली आणि इरफान हे बालपणापासूनचे जिगरी मित्र होते. दोघांनी शाळा आणि कॉलेजचे शिक्षण एकत्रच पूर्ण केले होते. हैदर अली यांच्यासोबत घडलेली ही घटना त्यांच्या कॉलेज जीवनातील आहे.
एके दिवशी इरफान आणि हैदर अली कॉलेजमधून घरी परतत होते. वाटेत अचानक हैदर अली यांना विजेचा जोरदार करंट लागला. शॉक लागल्याने हैदर तिथेच तडफडू लागले, पण आसपास असलेले लोक भीतीपोटी मदतीला पुढे येण्यास घाबरत होते. आपल्या मित्राला मृत्यूच्या दारात पाहून इरफानने क्षणाचाही विलंब केला नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इरफानने हैदर अली यांना त्या विजेच्या प्रवाहातून ओढून बाहेर काढले आणि मित्राचे प्राण वाचवले.
इरफान खानच्या याच धाडसामुळे हैदर अली यांचा जीव वाचला आणि पुढे जाऊन त्यांनी पोलीस दलात मोठी कामगिरी करुन ते IPS झाले. इरफान खानने आपल्या करिअरमध्ये 'मकबूल', 'पान सिंग तोमर', 'लाईफ ऑफ पाय' आणि 'पीकू' सारखे अनेक जबरदस्त चित्रपट दिले. २०२० मध्ये न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरमुळे इरफानचं निधन झालं. अभिनेत्याच्या जयंतीनिमित्त समोर आलेला हा मैत्रीचा किस्सा इरफानच्या चाहत्यांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.