'मिर्झापूर' सिनेमाचं पहिलं पोस्टर भेटीला! रिलीज डेटचीही झाली घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:17 IST2026-02-05T11:11:23+5:302026-02-05T11:17:16+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'मिर्झापूर' चित्रपटाबाबत अखेर मोठी घोषणा झाली आहे.

'मिर्झापूर' सिनेमाचं पहिलं पोस्टर भेटीला! रिलीज डेटचीही झाली घोषणा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्या 'मिर्झापूर' चित्रपटाबाबत अखेर मोठी घोषणा झाली आहे. 'मिर्झापूर' ही भारतातील सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आता मोठ्या पडद्यावर, म्हणजेच चित्रपटगृहात झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली असून, ४ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
कालीन भैया आणि गुडडू पंडित पुन्हा आमनेसामने
'मिर्झापूर' या वेब सीरिजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आता याच कथेचा थरार मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा 'कालीन भैया'च्या भूमिकेत दिसतील, तर अली फजल 'गुडडू पंडित' म्हणून पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. याशिवाय अभिषेक बॅनर्जी आणि 'मुन्ना भैया' म्हणजेच दिव्येंदू शर्मा यांच्या भूमिकेबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
मोठ्या पडद्यावरचा नवा अनुभव
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट वेब सीरिजचा केवळ पुढील भाग नसून, तो प्रेक्षकांना एका वेगळ्या स्केलवर 'मिर्झापूर'च्या जगाची सफर घडवून आणेल. चित्रपटाची भव्यता आणि त्यातील ॲक्शन सीक्वेन्स हे खास थिएटरमधील अनुभवासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरुमीत सिंग करत असून पुनीत कृष्णा यांनी याचे लेखन केले आहे.
'मिर्झापूर'च्या तिन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. मात्र, आता हा हिंसक ड्रामा मोठ्या पडद्यावर पाहणे हा चाहत्यांसाठी एक वेगळाच अनुभव असणार आहे. सोशल मीडियावर 'मिर्झापूर द मूव्ही'च्या रिलीज डेटची घोषणा होताच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला असून, "कालीन भैया परत आले आहेत" अशा कमेंट्सचा वर्षाव होत आहे. येत्या ४ सप्टेंबर २०२६ रोजी मिर्झापूरच्या गादीसाठी होणारा हा महासंग्राम मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी!