ऑनस्क्रीन शाहरुखला मारल्यानं चाहतीनं दिला नव्हता व्हिसा, बॉलिवूडच्या 'बॅडमॅन'ची स्टोरी माहितीए का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:21 PM2023-09-21T16:21:54+5:302023-09-21T16:22:48+5:30

बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजेच गुलशन ग्रोव्हर. आज गुलशन ग्रोव्हर 68 वर्षाचे झाले आहेत.

The Badman of Bollywood: story of Gulshan Grover | ऑनस्क्रीन शाहरुखला मारल्यानं चाहतीनं दिला नव्हता व्हिसा, बॉलिवूडच्या 'बॅडमॅन'ची स्टोरी माहितीए का?

gulshan grover

googlenewsNext

बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजेच गुलशन ग्रोव्हर. आज गुलशन ग्रोव्हर 68 वर्षाचे झाले आहेत. गेल्या 4 दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय असणाऱ्या  गुलशन यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका साकारल्या आणि नाव कमावलं. 80 च्या दशकात गुलशन यांनी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. खलनायकाची भूमिकेतून त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाची छाप पाडली. 

पण फार कमी लोकांना ठाऊक आहे की, चित्रपटसृष्टीत बॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे गुलशन ग्रोव्हर हे खऱ्या आयुष्यात खूप छान आणि विनयशील व्यक्ती आहेत. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी अनेकांच्या मनात खलनायक म्हणून घर केलं. एकदा तर  शाहरुखच्या एका चाहतीने गुलशन यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. याचं कारणही मजेशीर होतं. 

एका मुलाखतीमध्ये गुलशन यांनी सांगितलं होतं की, एकदा मोरोक्कोचा सिंगल डे व्हिसा हवा होता. यासाठी एका महिला अधिकाऱ्याशी भेट झाली. भेटल्यानंतर महिलेकडे मोरोक्कोचा एक दिवसाचा व्हिसा मागितला. पण, महिला अधिकाऱ्याने मला स्पष्ट नकार दिला. 'एका चित्रपटात तुम्ही शाहरुखला खूप मारलं होतं, त्यामुळे मी तुला व्हिसा देऊ शकत नाही', असे कारण महिला अधिकाऱ्यानं दिलं. 

यावर मी त्यांना हसून उत्तर दिलं की, "ही खऱ्या जीवनातील घटना नाही, तो तर फक्त चित्रपटातला सीन आहे. शाहरुख खऱ्या आयुष्यात माझा खूप चांगला मित्र आहे. चित्रपटामध्ये असे फाईट सीन्समध्ये करावे लागतात". पण एवढे समजून सांगितल्यानंतरही महिला अधिकाऱ्याने मला एका दिवसाचा व्हिसा दिला नाही.

गुलशन यांना बालपणापासून अभिनयाची आवड होती. १९७० मध्ये अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीहून ते मुंबईला आले. गुलशन ग्रोव्हरने अभिनयाची सुरूवात १९८० मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्तीच्या 'हम पांच' मधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपट बॉलिवूडला दिले आतापर्यंत 400 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तर २०१९ मध्ये गुलशन ग्रोव्हरची आटोबायोग्राफी 'Bad Man' रिलीज झाली होती. याचं लेखन रोश्मिला भट्टाचार्य आणि गुलशन ग्रोव्हरने केलं आहे. 

अभिनयाव्यतीरिक्त त्यांचं खाजगी आयुष्यही चर्चेत राहिलं.  5 वर्षांत दोनदा लग्न करूनही गुलशन ग्रोव्हर हे आज एकाकी आयुष्य जगत आहेत.  गुलशन कुमार यांचे पहिले लग्न 1998 साली फिलोमिना यांच्यासोबत झाले होते. पण  2001 साली त्यांचा घटस्फोट झाला. फिलोमिना यांच्यापासून त्यांना एक मुलगा आहे, ज्याचे नाव आहे संजय ग्रोव्हर. घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा त्यांच्यासोबतच राहतो. तर दुसरं लग्न त्यांनी कशिशसोबत केलं. पण हे लग्न केवळ 10 महिन्यातच तुटलं होतं. हे नातं तुटण्यामागचं कारण संजय होता. संजयचं कशिशसोबत पटायचं नाही, असं म्हटलं जातं.


 

Web Title: The Badman of Bollywood: story of Gulshan Grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.