'रामायण', 'बॉर्डर २' नंतर सनी देओलने साईन केला आणखी एक प्रोजेक्ट, फरहान अख्तरसोबत मिळवला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 14:45 IST2025-07-30T14:44:24+5:302025-07-30T14:45:52+5:30
सनी देओलचा भाव वधारला, एकामागोमाग एक प्रोजेक्ट्स येणार

'रामायण', 'बॉर्डर २' नंतर सनी देओलने साईन केला आणखी एक प्रोजेक्ट, फरहान अख्तरसोबत मिळवला हात
'गदर २' गाजवल्यानंतर सनी देओलचं (Sunny Deol) सिनेसृष्टीतलं वजन पुन्हा वाढलं आहे. लवकरच तो 'बॉर्डर २'मध्येही दिसणार आहे. तसंच नितेश तिवारींच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' सिनेमात तो हनुमानाच्या भूमिकेत आहे. दरम्यान सनी देओलने आता फरहान अख्तरच्या 'एक्सेल एंटरटेन्मेंट'सोबतही हातमिळवणी केली आहे. फरहान आणि रितेश सिधवानीच्या प्रोडक्शनसोबत तो नवीन सिनेमासाठी जोडला गेला आहे. हा एक अॅक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे.
'पिंकव्हिला'रिपोर्टनुसार, सनी देओल पहिल्यांदाच एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत काम करणार आहे. काही दिवसांपासून दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. हा एक बिग बजेट अॅक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे ज्यासाठी ते एकत्र येत आहेत. सनी देओलला स्क्रिप्ट आवडली असून त्याने होकारही दिला आहे. तसंच प्रेक्षकांना आवडेल अशीच सनी देओलची भूमिका असणार आहे. एक्सेलही असाच प्रयत्न करत आहे.
तमिळ सिनेमांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक राहिलेल्या बालाजी यांच्याकडे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली जाऊ शकते. जर सगळं सुरळीत झालं तर या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरमध्ये सिनेमाचं शूटही सुरु होणार आहे.
सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचा 'बॉर्डर २' सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. ३ जानेवारी २०२६ ही रिलीज डेट असणार आहे. तसंच पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर 'रामायण'रिलीज होणार आहे. याशिवाय आमिर खान निर्मिती करत असलेल्या 'लाहोर १९४७'मध्ये सनी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत आहेत.