गोविंदानं माफी मागितल्यानंतर पत्नी सुनितानं शेअर केला व्हिडीओ, म्हणाली "काहीच गरज नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 11:59 IST2025-11-14T10:58:14+5:302025-11-14T11:59:30+5:30
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा सध्या चर्चेत आले आहेत.

गोविंदानं माफी मागितल्यानंतर पत्नी सुनितानं शेअर केला व्हिडीओ, म्हणाली "काहीच गरज नाही..."
Sunita Ahuja : बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा सध्या चर्चेत आले आहेत. नुकतेच गोविंदाने पुजारीबद्दल केलेल्या पत्नीच्या टिप्पणीवर जाहीर माफी मागितली होती. मात्र, आता सुनीता आहुजानं पती गोविंदाच्या या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोविंदाचं माफी मागणं अजिबात आवडलं नसल्याचं सुनिता आहुजानं म्हटलं.
गोविंदाने पुजारी मुकेश शुक्ला यांच्याविरुद्ध केलेल्या पत्नीच्या विधानाबद्दल सोशल मीडियावर हात जोडून माफी मागितली होती. यावर प्रतिक्रिया देताना सुनिता आहुजानं आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनिता म्हणाली, "माझे आदर्श, गोविंदा जी, जे माझे पती आहेत, त्यांनी हात जोडून माफी मागितली आहे आणि मला ते अजिबात आवडले नाही. गोविंदानं कधीही कोणासमोरही माझ्यासाठी हात जोडावे असे मला वाटणार नाही. गोविंदाला माफी मागण्याची काहीच गरज नव्हती".
आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना सुनिता आहुजानं सांगितले की, तिने कोणाचेही नाव घेतले नव्हते, केवळ एक अनुभव शेअर केला होता. पुढे ती म्हणाली, "जर तुम्हाला वाईट वाटले असेल, तर मी प्रत्येक सिद्धपीठाच्या गुरूंची हात जोडून माफी मागू इच्छिते".
सुनितानं पुजाऱ्यांबद्दल नेमकं काय म्हटलं होतं ?
सुनितानं एका पॉडकास्टवर गोविंदाच्या धार्मिक खर्चावर भाष्य केले होते. तिनं सांगितलं होतं की, गोविंदा हा ज्योतिषी आणि पुजाऱ्यांवर खूप पैसे खर्च करतो. तो कधीकधी पूजेसाठी २ लाख रुपयांपर्यंत पैसे देतो. पत्नीच्या या विधानानंतर काही वेळातच गोविंदाने कुटुंबातील पुजारी आदरणीय मुकेश शुक्ला जी यांच्याविरोधात केलेल्या विधानाचा निषेध केला आणि माफी मागितली. त्यानं इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात गोविंदा म्हणाला, "नमस्कार, मी गोविंदा आहे आणि मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की माझे कुटुंबातील पुजारी, आदरणीय मुकेश शुक्ला जी, खूप सक्षम, प्रतिभावान आणि प्रामाणिक आहेत. आमचे कुटुंब नेहमीच तुमच्याशी जोडलेले आहे. माझ्या पत्नीने वापरलेल्या अपशब्दांसाठी मी माफी मागतो".