"भाषा सक्तीसाठी होणारी मारहाण चुकीची, पण मुंबईत..." सुनील शेट्टीनं मांडलं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:19 IST2025-11-28T13:18:55+5:302025-11-28T13:19:28+5:30
"मराठी भाषेवरून होणारं राजकारण आणि सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा आहे", असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता सनील शेट्टीनं केलं आहे.

"भाषा सक्तीसाठी होणारी मारहाण चुकीची, पण मुंबईत..." सुनील शेट्टीनं मांडलं रोखठोक मत
महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणूस आणि परप्रांतीय लोकांमध्ये अनेकवेळा भाषेवरून वाद होताना दिसतात. मुंबईमध्ये राहायचे असेल तर मराठी भाषा बोलावी लागेल असा आग्रह मराठी माणसाचा असतो तर काही परप्रांतीय मराठी बोलण्यास स्पष्ट नकार देतात. यावरून अनेकदा वाद झाले आहेत आणि काही भागात अजूनही होतात. यातून खटके उडाले आहेत आणि मारहाणीच्या घटनादेखील घडल्या. यातच आता "मराठी भाषेवरून होणारं राजकारण आणि सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा आहे", असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता सनील शेट्टीनं केलं आहे.
सुनील शेट्टीनं नुकतंच एबीपी माझाच्या महाकट्टावर दिलखुलास गप्पा मारल्या. या मुलाखतीमध्ये त्याला "लहानपणापासून तुम्ही वाढलेले आहात. त्यामुळे मराठी भाषेशी संबंध आलाच आहे. आता जेव्हा गेल्या काही वर्षांपासून मराठी भाषेवरुन जे काही राजकारण होतं आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि मराठी भाषा तुमच्यासाठी काय आहे?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुनील शेट्टीनं रोखठोक उत्तर दिलं. तो म्हणाला, "मराठी भाषेवरून होणारं राजकारण चुकीचं आहे. सक्तीसाठी होणारी जबरदस्ती आणि हिसांचार चुकीचा आहे. गरिबांना मारहाण करुन काहीच उपयोग नाही".
सुनील शेट्टी पुढे म्हणाला, "मी मुंबईकर आहे. मला मुंबईनं सर्व काही दिलं. नाव, प्रसिद्धी, अशी जीवनशैली ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता. मी मुंबईकर म्हणून हेदेखील स्पष्ट करतो की मराठी बोलणं आणि शिकणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण कुठे राहतो, तेव्हा त्या शहराचं आणि देशाची भाषेत बोलतो, तेव्हा ते प्रेम आणि आदर दहापटीने वाढतो. माझ्या घरात मी माझ्या स्टाफबरोबर मराठीतच बोलतो. पण, हेही तेवढंच खरं आहे की भाषा बोलण्यासाठी तुम्ही कुणालाही जबरदस्ती करु शकत नाही. जबरदस्ती करुन आपण आपल्या मुलांना काही शिकवू शकत नाही".