'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:15 IST2025-09-30T11:14:32+5:302025-09-30T11:15:01+5:30
बॉलिवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याला ड्रग्जची तस्करी करताना पोलिसांनी पकडलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. क

'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
बॉलिवूडमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याला ड्रग्जची तस्करी करताना पोलिसांनी पकडलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून अभिनेत्यावर कोकेन ड्रग्जची तस्करी केल्याचा आरोप आहे. चेन्नई कस्टम्स आणि महसूल गुप्तचर संचालनालयाने संयुक्तपणे ही कारवाई केली असून अभिनेत्याकडून तब्बल ३.५ किलोचं कोकेन जप्त करण्यात आलं आहे. ज्याची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये इतकी आहे.
ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या बॉलिवूड अभिनेत्याचं नाव समोर आलेलं नाही. मात्र त्याने स्टुडंट ऑफ द इयर यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये साहाय्यक भूमिका साकारल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी सकाळी अभिनेता सिंगापूरहून चेन्नई विमानतळावर उतरला. चेन्नई विमानतळावरील एअर इंटेलिजेंस युनिटला माहिती मिळाली होती. त्यानुसार अभिनेत्याच्या सामानाची झडती घेण्यात आली. त्याच्या सामानात पांढरी पावडर असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. तपासणीनंतर ते कोकेन ड्रग्ज असल्याचं निष्पण्ण झालं. सुरुवातीला अभिनेता हे मान्य करण्यास तयार नव्हता. पण, नंतर चौकशीत त्याने कंम्बोडियावरुन सिंगापूर आणि सिंगापूरवरुन चेन्नई असा विमान प्रवास केल्याचं सांगितलं.
कंम्बोडियामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ती ट्रॉली बॅग दिल्याचं अभिनेत्याने सांगितलं. ही बॅग त्याला चेन्नई विमानतळावर एका व्यक्तीकडे सुपूर्द करायची होती. पण, ही ड्रग्जची तस्करी चेन्नईपर्यंत नव्हे तर दिल्ली किंवा मुंबईमध्ये होणार होती, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. डीआरआय या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. अभिनेत्याचा याआधी ड्रग्ज तस्करी प्रकरणात सहभाग होता का? याचीही चौकशी केली जात आहे.