संदीप रेड्डी वांगासोबत पुन्हा काम करणार रणबीर कपूर, 'या' चित्रपटात एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:21 IST2025-11-25T12:20:26+5:302025-11-25T12:21:27+5:30
दोन सुपरस्टार्स पहिल्यांदा एकत्र दिसणार!

संदीप रेड्डी वांगासोबत पुन्हा काम करणार रणबीर कपूर, 'या' चित्रपटात एन्ट्री!
Spirit Movie Ranbir Kapoor Cameo : 'अॅनिमल' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा "स्पिरिट" हा चित्रपट सध्या देशभर चर्चेत आहे. साऊथ सुपरस्टार प्रभास स्टारर या कॉप अॅक्शन थ्रिलरचे शूटिंग नुकतंच सुरू झालं आहे. मात्र, या चित्रपटाबद्दल आता एक अत्यंत मनोरंजक बातमी समोर आली आहे. वांगा यांनी पुन्हा एकदा त्यांचा 'अॅनिमल'मधील अभिनेता रणबीर कपूरशी संपर्क साधला आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीर कपूरला "स्पिरिट" मध्ये कॅमिओ रोलची ऑफर दिली आहे. सर्व गोष्टी जुळून आल्या तर रणबीर कपूर आणि प्रभास हे दोन मोठे सुपरस्टार्स पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र दिसतील.
'डेक्कन क्रॉनिकल'मधील वृत्तानुसार, "स्पिरिट या चित्रपटात रणबीर कपूर अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे". रणबीर कपूरचा हा कॅमिओ केवळ एक छोटी भूमिका नसेल, तर तो "स्पिरिट"च्या कथानकाला एक मोठे आणि अनपेक्षित वळण देणार आहे.
'स्पिरिट' चित्रपट चर्चेत येण्याचे कारण म्हणजे कास्टिंगमधील बदल. या चित्रपटासाठी सुरुवातीला दीपिका पदुकोणला कास्ट करण्यात आले होते, परंतु कामाच्या वेळेवरून वाद निर्माण झाल्यामुळे तिला चित्रपटातून बाहेर पडावे लागले. परिणामी, 'अॅनिमल'मध्ये रणबीरसोबत काम केलेली अभिनेत्री तृप्ती डिमरीची चित्रपटात एन्ट्री झाली. प्रभास अभिनीत हा चित्रपट एक कॉप अॅक्शन थ्रिलर आहे.
अनेक महिन्यांच्या प्री-प्रॉडक्शननंतर, 'स्पिरिट'चे शूटिंग नुकतेच २३ नोव्हेंबर रोजी एका पूजा समारंभाने सुरू झालं आहे. "स्पिरिट" ची निर्मिती टी-सीरीज आणि भद्रकाली पिक्चर्सच्या बॅनरखाली होत आहे. यात प्रभास आणि तृप्ती डिमरी यांच्यासह विवेक ओबेरॉय, कांचना आणि प्रकाश राज यांसारखे दिग्गज कलाकार देखील दिसणार आहेत.
रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी दोन मोठ्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहे. तो ऑगस्ट २०२६ मध्ये संजय लीला भन्साळींच्या "लव्ह अँड वॉर" मध्ये आलिया भट आणि विकी कौशल यांच्यासोबत दिसणार आहे. तर दिवाळी २०२६ मध्ये तो भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट असलेल्या "रामायण भाग १" मध्ये झळकणार आहे.