दक्षिणेतील दिग्दर्शक वेंकट प्रभू येणार हिंदी चित्रपटसृष्टीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 12:39 PM2021-12-26T12:39:36+5:302021-12-26T12:40:00+5:30

Venkat Prabhu : तमीळमधील ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेते, लेखक असलेले वेंकट प्रभू यांचे सरोजा, गोवा, मनकथा, बिर्याणी, चेन्नई-६०००२८ यासारखे चित्रपट चांगलेच गाजले.

Southern director Venkat Prabhu will appear in Hindi films | दक्षिणेतील दिग्दर्शक वेंकट प्रभू येणार हिंदी चित्रपटसृष्टीत

दक्षिणेतील दिग्दर्शक वेंकट प्रभू येणार हिंदी चित्रपटसृष्टीत

googlenewsNext

- अल्पेश करकरे 

मुंबई : दक्षिण भारतात सध्या गाजत असलेला ‘मानाडू’ हा सिनेमा प्रदर्शनातील अनेक अडथळे पार करून अखेर नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित झाला. शुक्रवारी तो ओटीटीवरही प्रदर्शित झाला. सायन्स थ्रीलर असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शक वेंकट प्रभू गेल्या आठवड्यात मुंबईत मुक्कामी होते. तमीळमधील ख्यातनाम दिग्दर्शक, अभिनेते, लेखक असलेले वेंकट प्रभू यांचे सरोजा, गोवा, मनकथा, बिर्याणी, चेन्नई-६०००२८ यासारखे चित्रपट चांगलेच गाजले. ज्येष्ठ संगीतकार इलया राजा यांचे ते पुतणे आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या पदार्पणाच्या निमित्ताने त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.

कलाक्षेत्रातील आपला वावर आता दशकभराचा झाला आहे. त्याबद्दल काय सांगाल?
चित्रपटसृष्टीशी माझ्या परिवाराचा खूप निकटचा संबंध आहे. माझे काका ज्येष्ठ संगीतकार इलया राजा, वडील गंगाई अमरन आणि इतरही काही नातेवाइकांमुळे सिनेमाविषयी मला लहानपणापासूनच आवड निर्माण झाली. लहानपणी काही चित्रपटांत मी कामही केले. माझे शिक्षण लंडनमध्ये झाले. चित्रपट दिग्दर्शन, अभिनय, लेखन मला पूर्वीपासून आवडत होतं. लंडनहून आल्यावर हळूहळू मी चित्रपट करू लागलो. त्यात स्थिर होत होतो आणि मी जे केले ते दाक्षिणात्य प्रेक्षकांना भावले. त्यामुळेच आतापर्यंत मी १० चित्रपटांचे दिग्दर्शन, १५ चित्रपटांत अभिनय आणि २५ चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आता मी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. 

संगीतकार इलया राजा यांचा तुमच्यावर किती प्रभाव आहे?
इलया राजा हे माझे सख्खे चुलते. अर्थात माझे वडील गंगाई अमरन हे त्यांचे बंधू. आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्या कलाक्षेत्रातल्या योगदानाचा अभिमान आहे. मला लहानपणापासून त्यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव, कार्यकुशलता या चार गुणांची शिकवण त्यांच्याकडून मिळाली. आपल्याला जे आवडते ते चांगले सादर करता येते. त्यामुळे तेच मन लावून करावे, म्हणजे सगळे मिळते, असे त्यांनी पान १ वरून)   मला सांगितले होते. त्यांचे हे म्हणणे मी नेहमी लक्षात ठेवतो. 

तुम्ही दिग्दर्शनाकडे कसे वळलात?
माझे वडील संगीत दिग्दर्शक आणि लेखक होते. संगीत घरात होतेच. मला मात्र लिहिण्याची, सादर करण्याची गोडी होती. त्यामुळे मी प्रथम अभिनयास सुरुवात केली. हे करत असताना लेखन आणि दिग्दर्शनही सुरू होते. त्याचवेळी मी एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे चिरंजीव चरण यांच्यासह ‘चेन्नई-६०००२८’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेथून दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला. मला जे चांगले जमते ते मी करतो. मी केलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडतात, असे आता म्हणता येईल.

हिंदी चित्रपटांसाठी काय विचार केला आहे?
तमीळ, मल्याळम, मराठी या भाषांमध्ये उत्तम चित्रपट निर्मिती होते. या चित्रपटांमधील ऐवज फार वेगळा असतो. उदाहरणार्थ, ‘मानाडू’ हा त्या राज्यातील एक वेगळी परिस्थिती मांडणारा चित्रपट आहे. तो तमीळ भाषेत आहे, त्याला सबटायटलही आहेत. मात्र, हाच चित्रपट जर हिंदीत झाला तर तो जगभर पोहोचण्यास मदत होते. त्यासाठी ‘सैराट’चे उदाहरण देता येईल. चित्रपट हिंदीत किंवा इंग्रजीत बनवले तर भाषेचा अडथळा येत नाही. म्हणूनच मी आता हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतो आहे.

Web Title: Southern director Venkat Prabhu will appear in Hindi films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.